घरपालघर६९ गावांच्या पाण्यासाठी काँग्रेस आक्रमक

६९ गावांच्या पाण्यासाठी काँग्रेस आक्रमक

Subscribe

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार होती. परंतु महापालिकेच्या माध्यमातून सामायिकपणे योजनेचे काम चालू होते.

वसई: तालुक्यातील ६९ गावांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी झटकल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. महापालिकेने ठरल्याप्रमाणे गावांना त्वरीत पाणीपुरवठा केला नाही तर आयुक्तांच्या दालनात आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर वर्तक यांनी दिला आहे.
वसईतील 69 गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही योजना डिसेंबर 2008 रोजी मंजूर करण्यात आली आहे. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते फेब्रुवारी 2009 ला सुमारे 85 कोटी रुपयांची वसई तालुक्यातील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर 3 जुलै 2009 रोजी वसई विरार शहर महापालिकेची स्थापना झाली. त्यामुळे या योजनेतील 69 गावांपैकी 52 गावांचा समावेश महापालिकेत झालेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार होती. परंतु महापालिकेच्या माध्यमातून सामायिकपणे योजनेचे काम चालू होते.

सुरुवातीला या योजनेद्वारे 69 पाण्याचे जलकुंभ उभे करण्यात आले आणि गावागावात पाईपलाईन टाकण्यात आली. ही योजना पूर्ण करण्यास सातत्याने विलंब झाल्याने योजना पूर्णत्वाची तारीख सातत्याने बदलून दिनांक 31 मार्च 2019 रोजी योजना पूर्ण करण्याची तारीख अंतिम करण्यात आली. त्यातच अगोदरची पाईपलाईन निकृष्ट दर्जाची असल्याने वसई विरार महापालिकेने नव्याने सुमारे 12 कोटी खर्च करून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम ऑक्टोबर 2019 रोजी चालू केले. परंतु आतापर्यंत 97 कोटी रुपये खर्च करूनही मागील 13 वर्षापासून योजना पूर्णच होत नाही. तसेच पाईपलाईनही टाकण्याचे कामही अर्थवट झालेले आहे, असा आरोप वर्तक यांनी केला आहे.

- Advertisement -

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 2006 पासून सातत्याने पाठपुरावा करीत असून वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आलेली आहेत. काँग्रेसने २० डिसेंबर २० ला योजनेतील वाघोली गावातील पाण्याच्या टाकीच्या खाली आमरण उपोषणास केले होते. त्यावेळी महापालिकेतर्फे जून 2021 पर्यंत ही योजना पूर्व होवून सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. जे आजपर्यंत पूर्ण झालेले नाही. तसेच ७ फेब्रुवारी २० रोजी पालघर जिल्हाधिकार्‍यांकडे झालेल्या बैठकीत 69 पैकी 52 गावांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी वसई विरार महापालिकेची असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते, अशी माहिती वर्तक यांनी दिली. मात्र, २५ जुलै २२ ला वर्तकांनी शिष्टमंडळासह आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली तेव्हा पवार यांनी जबाबदारी अमान्य केली. तसेच पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळालेच पाहिजे हे स्पष्टपणे अधोरेखित केलेले असतांनाही महापालिका ही जबाबदारी झटकू पाहत आहेत.

तसेच महापालिका क्षेत्रातील 52 गावे आणि उर्वरित 17 गावे ज्यांचे नियोजन प्राधिकरण महापालिकेकडेच आहे म्हणून सर्व 69 गावांना पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी ही महापालिकेचीच आहे, असेही वर्तक यांनी सांगितले.
डिसेंबर 2022 पर्यंत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून १८५ एमएलडी पाणी वसई – विरारसाठी मिळणार आहे. परंतु यातील पाणी वसईतील 69 गावातील गावकर्‍यांना मिळणारच नाही. म्हणजेच वसईतील 69 गावातील भूमिपुत्र नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचितच राहणार आहोत आणि वसईतील भूमीपूत्रांची तहान महापालिकेतर्फे भागवली जाणारच नाही, असा वर्तक यांचा आरोप आहे. त्यातच शासनाची कोणतीही पाणी पुरवठ्याची व्यवस्था नसल्याने 69 गावातील नागरिक जे जमिनीतील पाणी पिण्यासाठी वापरतात त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून त्या पाण्यात क्षारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना विविध आजारांशी सामना करावा लागत आहे, अशी वर्तकांची तक्रार आहे. ६९ गावांना पाणीपुरवठा केला जाईल, अशी हमी आयुक्तांनी दिल्यानेच आमरण उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले होते. पण, नवे आयुक्त शब्द फिरवत असल्याने काँग्रेसला पुन्हा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा वर्तक यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -