ठरलं ! मार्च अखेरीस त्या उड्डाणपुलाचे उद्घाटन

त्यामुळे बराच वेळ वाया जात आहे. हा उड्डाणपूल पोलीस परेड ग्राउंडच्या रस्त्याला जोडण्यात आला आहे.

पालघर: जिल्हा मुख्यालय व पालघर पूर्वेकडील भागास एकत्र आणणार्‍या उड्डाणपुलाची मजबुतीची व स्थिरतेची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीचा अहवाल आल्यावर मार्च अखेरपर्यंत हा उड्डाणपूल सुरू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सांगण्यात येत आहे उड्डाण पुलावरून दुचाकी व चार चाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. मात्र अधिकृतरित्या उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा मुख्यालयाकडून नंडोरे व कोळगाव पूर्वकडे औद्योगिक वसाहत आहे. तिथे जाण्यास कोळगाव रेल्वे फाटक ओलांडून जावे लागते. त्यामुळे बराच वेळ वाया जात आहे. हा उड्डाणपूल पोलीस परेड ग्राउंडच्या रस्त्याला जोडण्यात आला आहे.

पालघर पूर्वेकडील जेनेसिस औद्योगिक वसाहतीत जाणार्‍या कामगार व अवजड वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल सोयीचा ठरणार आहे. भविष्यात हा उड्डाणपूल थेट नंडोरे येथील रस्त्याला जोडण्यात येणार असल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालयात येण्यासाठी होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्नही निकालात निघणार आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम झाल्यावर लोड व एनडीटी टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये उड्डाणपुलावर ठराविक भार ठेवून पुलाच्या मजबुतीची तपासणी व्हीजेटीआयकडून करण्यात आली आहे. त्यांनी अजूनपर्यंत त्याबाबत अहवाल दिलेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्र्यांची वेळ उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे,अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.