घरपालघरमुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे चा इंटरचेंज मासवण ऐवजी नागझरी येथे करण्याची मागणी

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे चा इंटरचेंज मासवण ऐवजी नागझरी येथे करण्याची मागणी

Subscribe

पालघर जिल्ह्यात द्रुतगती महामार्गावर चढण्या-उतरण्यासाठी पालघर-मनोर रस्त्यावरील मासवण आणि डहाणू-नाशिक राज्य महामार्गावरील गंजाड येथे इंटरचेंज बनविण्यात येणार आहे.

वाणगाव : मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेचे पालघर जिल्ह्यातील काम सुरू करण्यात आले असून या द्रुतगती महामार्गावर प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी असलेला इंटरचेंज मासवण येथे करण्यात येणार असल्याने तारापूर येथील उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई (जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट) ते वडोदरा या दोन मोठ्या शहरांना जोडणार्‍या ३७९ कि.मी. लांबीच्या एक्सप्रेस वेचे काम सुरू झाले आहे. या ८ पदरी एक्सप्रेस वे ची पालघर जिल्ह्यातील एकूण लांबी ७८ कि.मी. असून वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ५१ गावांतून हा एक्सप्रेस वे जाणार आहे. यासाठी एकूण ९०१ हेक्टर जागा संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेचे काम पालघर जिल्ह्यात एकूण ३ पॅकेजेसमध्ये सुरू असून यातील पॅकेज क्र.११ मध्ये गंजाड ते तलासरीपर्यंत २६ कि.मी.चे काम आरकेसी इन्फ्राबिल्ट, पॅकेज क्र.१२ गंजाड ते मासवण पर्यंत २६ कि.मी.चे काम मोंटेकार्लो आणि पॅकेज १३ मासवण ते शिरसाड पर्यंत २७ कि.मी.चे काम जीआर इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले असून जमिनीवरील प्रत्यक्ष कामांस सुरुवात करण्यात आली आहे. या द्रुतगती महामार्गावरील प्रवास अतिशय वेगवान असणार असून ताशी १२० कि.मी. वेगाने वाहने धावणार आहेत. या द्रुतगती महामार्गामुळे ठाणे आणि नवी मुंबईच्या बाहेरून प्रवासी आणि मालवाहू वाहने थेट विना अडथळा जेएनपीटी बंदरापर्यंत पोचणार आहेत. पालघर जिल्ह्यात द्रुतगती महामार्गावर चढण्या-उतरण्यासाठी पालघर-मनोर रस्त्यावरील मासवण आणि डहाणू-नाशिक राज्य महामार्गावरील गंजाड येथे इंटरचेंज बनविण्यात येणार आहे.

मात्र यातील मासवण येथील इंटरचेंज हा तारापूर औद्योगिक वसाहतीत ये-जा करणार्‍या वाहनांसाठी सोयीस्कर नसल्याने त्या ऐवजी बोईसर-चिल्हार रस्त्यावरील नागझरी येथे इंटरचेंज बनविण्याची मागणी होत आहे.चिल्हार-बोईसर रस्ता हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आणि देशातील सर्वात मोठ्या तारापूर एमआयडीसीला जोडत असून या रस्त्यावरून २४ तास हजारो मालवाहू अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. सध्या ही वाहने बोईसर-चिल्हार मार्गे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून जेएनपीटी, ठाणे आणि मुंबईच्या दिशेने तर दुसर्‍या बाजूने गुजरातकडे जात असतात. त्या तुलनेत पालघर मनोर मार्गावरून प्रवास करणार्‍या मालवाहू वाहनांची संख्या कमी आहे. मासवण येथे इंटरचेंज झाल्यास औद्योगिक वसाहतीमधील मालवाहू वाहनांना महाराष्ट्रातील जेएनपीटी आणि गुजरातमधील हाजिरा, मुंद्रा सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय बंदरात माल पोचवण्यासाठी अधिकचा वेळ आणि जास्त इंधन खर्ची घालावे लागणार आहे. त्यामुळे मासवणऐवजी बोईसर-चिल्हार मार्गावरील नागझरी येथे मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचा इंटरचेंज करणे जास्त फायदेशीर असल्याने नागझरी येथे इंटरचेंज करण्याची मागणी तारापूर औद्योगिक वसाहत येथील उद्योजकांकडून होत आहे.

- Advertisement -

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेचा इंटरचेंज हा बोईसर-चिल्हार रस्त्यावरील नागझरी येथे करणे आवश्यक होते. मात्र हा इंटरचेंज पालघर-मनोर रस्त्यावरील मासवण येथे करण्यात येणार असल्याने तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये ये-जा करणार्‍या हजारो अवजड मालवाहू आणि प्रवासी वाहनांसाठी अव्यवहार्य ठरणार आहे. तरी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी फेरविचार करणे आवश्यक आहे.
– निलेश पाटील,जनसंपर्क अधिकारी, टीमा तारापूर

मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वेचा मासवण येथील इंटरचेंज हा नागझरी येथे करण्यासंदर्भात तारापूर येथील उद्योजकांकडून मागणी केली गेल्यास तांत्रिक व्यवहार्यता तपासून तसा प्रस्ताव संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे पाठविण्यात येईल.
– डॉ.गोविंद बोडके, जिल्हाधिकारी पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -