धामणी धरण ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह वसई विरार महापालिकेची तहान भागवणार्‍या सूर्या प्रकल्पातील धामणी धरणे ओव्हरफ्लो झाल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडण्यात आले.

धामणी धरण ओव्हरफ्लो

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह वसई विरार महापालिकेची तहान भागवणार्‍या सूर्या प्रकल्पातील धामणी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सोमवारी दुपारी १२ वाजता धरणाचे सर्व पाचही दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सूर्या नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सूर्या प्रकल्पातील धामणी धरण जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणातून जिल्हयासह वसई विरार महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. तसेच सिंचनासाठीही पाणी पुरवले जाते. गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसाने सोमवारी धरण ओव्हरफ्लो झाले.

धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे सर्व पाचही दरवाजे ४१ सेमीने उघडण्यात आले. त्यामुळे खालच्या बाजूला असलेल्या कवडास बंधार्‍यामध्ये ७८५३ क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. कवडास बंधार्‍यातून सूर्या नदी पात्रात एकूण १५२०० क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जात असल्याने सूर्या नदीची पाणी पातळी वाढण्याच्या शक्यतेने खबरदारीचा उपाय म्हणून डहाणू आणि पालघर तालुक्यातील सूर्या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील वर्षे १६ ऑगस्टला ओव्हरफ्लो झालेले धामणी धरण यावर्षी मात्र सूर्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील अनियमित पावसामुळे धरण पूर्ण भरण्यास मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास २५ दिवसांचा अधिक कालावधी लागला आहे. त्यामुळे या धरणातील पाण्यावर अवलंबून असणारे डहाणूपासून वसई पर्यंतचे लाखो नागरिक, उन्हाळी शेती करणारे शेतकरी तसेच तारापूर-वसई मधील हजारो उद्योगांच्या आगामी काळात होणार्‍या पाणी कपातीच्या शक्यतेने तोंडचे पाणी पळाले होते. परंतु मागील आठवड्यापासूनच धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने आधीची सर्व कसर भरून काढत धामणी धरण १०० टक्के ओव्हरफ्लो झाल्याने संपूर्ण पालघर जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा –

Antilia case: सचिन वाझे यांना वोकहार्ट रुग्णालयात केले दाखल