घरपालघरआधी समुद्राची रेती घेतली आता दगड

आधी समुद्राची रेती घेतली आता दगड

Subscribe

सुरुच्या बागा त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आता दगड तस्करीची भर पडल्याने त्यावर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर लहान मासेमारांचा रोजगारच त्यामुळे नष्ट होण्याची भिती आहे.

वसईःसमुद्रकिनारी होणारी वाळू तस्करी महाराष्ट्रात काही नवी नाही.इतकी वर्षे हे ओरबाडणे चालूच आहे. वसईतही समुद्र किनार्‍यावरून रेती वाळू याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरु असते. त्यावर नियंत्रण आणण्यात यंत्रणा पूर्णतः अयशस्वी झाल्या आहे. असे असताना आता लांबच लांब पसरलेल्या या किनार्‍यावरील ओहोटीची वेळ पाहून दगडांचीही तस्करी सुरु झाली आहे. वसई पश्चिमेकडील रानगाव ते भुईगाव येथील किनार्‍यापासून थोड्याच अंतरावर विस्तीर्ण पसरलेले दगड आहेत. भरतीच्यावेळी ते समुद्रात गायब होतात. मात्र, ओहोटीला दिसू शकणारे असे दगड आता हळूहळू गायब व्हायला सुरूवात झाली आहे. काही महिन्यांपासून या दगडांची चोरी होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ही वाहतूक रात्रीच्या सुमारास चालत असल्याचा काहींचा अंदाज आहे. येथील मोठा परिसर आता तस्करांनी साफ केला आहे. आधीच रेती वाळू तस्कारांनी धुमाकूळ घालून किनारे या तस्करांनी बकाल केले आहेत. त्यात आता तस्करी करणारे थेट समुद्रातील आतील भागात शिरकाव करून तस्करी करू लागल्याने त्यावर नियंत्रण आणण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. वाळू तस्करीमुळे वसई तालुक्यातील अनेक निसर्गरम्य समुद्रकिनार्‍यांची हानी होऊ लागली आहे. सुरुच्या बागा त्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आता दगड तस्करीची भर पडल्याने त्यावर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर लहान मासेमारांचा रोजगारच त्यामुळे नष्ट होण्याची भिती आहे.

पिवळे आणि काळे असे हे दगड मोठ्या प्रमाणात या भागात आढळून येतात. कालवे, शिंपल्या इत्यादी मत्स्य जीव या मोठ्या दगडांच्या आधारे जिवंत असतात. अनेक वर्षांपासून ओहोटीच्यावेळी छोटे मासेमार मासेमारी करीत असतात. हा त्यांच्या उपजिविकेचा मुख्य व्यवसाय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -