घरपालघरसावर्डे पूलासाठी निधी मंजूर; आदित्य ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर पूलाचा मार्ग मोकळा

सावर्डे पूलासाठी निधी मंजूर; आदित्य ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर पूलाचा मार्ग मोकळा

Subscribe

वैतरणा नदीवरील पुलाच्या कामाला १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

मोखाडा तालुक्यातील सावर्डे गाव ते शहापूर तालुक्यातील गावाला जोडणारा वैतरणा नदीवरील पुलाच्या कामाला १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून हे काम जिल्हा प्रशासनाने तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सावर्डे गावाचे सरपंच हनुमंत पादीर व त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन वास्तविक परिस्थिती सांगितली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या परिस्थितीबाबत पालकमंत्री दादा भुसे यांना माहिती दिली. पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणात लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला तातडीने पादचारी पूल बांधण्याच्या सूचना केल्या.

मोखाडा तालुक्यातील सावर्डे गाव तसेच आसपासच्या गावातील आदिवासी बांधवांना शहापूर तालुक्यामध्ये जायचे असल्यास त्यांना लाकडी ओडक्याच्या आधारे जावे लागत आहे. यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये व नागरीकांना सुरक्षित नदीपार करता यावी. यासाठी तातडीने जिल्हा नियोजन समितीमार्फत पंधरा लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनामार्फत हे काम तातडीने हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. या पुलाचे काम सुरू झाल्यापासून ते पूर्णत्वास येण्यापर्यंत जिल्हा प्रशासनामार्फत वेळोवेळी भेटी देऊन पाहणी करण्यात येणार आहे. या लोखंडी पादचारी पुलामुळे मोखाडा तालुक्यातील तसेच शहापूर तालुक्यातील आदिवासी बांधव, विद्यार्थी व चाकरमानी यांना सुरक्षित नदीपार करता येणार आहे, असे यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

- Advertisement -

सावर्डे दापोरा हा रस्ता १ कि.मी. लांबीचा आहे. हा रस्ता कच्चा व मातीचा असून सावडे येथील ग्रामस्थ या रस्त्याचा वापर हा ठाणे जिल्ह्यातील दापोरामार्फत कसारा येथे जाण्यासाठी करतात. या रस्त्यावर पालघर व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवरुन वैतरणा नदी वहात असून नदीचे पात्र हे पावसाळा वगळता अंरुद १२ मीटर असते. मात्र या नदीवर वरच्या बाजूस धरण असल्याने पावसाळ्यात धरणातून अतिरीक्त पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नदीला पूर येवून नदीचे पात्राची रुंदी जवळपास साधारण ९० मीटरपर्यंत वाढते. नदी ही बारमाही वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहाचा वेग हा मोठ्या प्रमाणात असतो. या अरुंद पात्रावर ग्रामस्थांनी नदी ओलांडण्यासाठी लाकडी ओडका टाकला असून त्यावरून ग्रामस्थ ये-जा करतात. यामुळे ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात १५. मीटर लांबीचा पादचारी पूल बांधणे आवश्यक आहे. या तात्पुरत्या पुलामुळे ग्रामस्थांना सुरक्षित नदी ओलांडता येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. कायमस्वरूपी १०० मीटर लांबीचा पूल बांधण्याकरता २ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधीसुद्धा उपलब्ध करून देऊन कायमस्वरूपी पुलाचे काम सुद्धा लवकरात लवकर चालू करण्याचे निर्देश देखील प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही भुसे यांनी सांगितले.

हेही वाचा –

देशभरात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -