घरपालघरसाफसफाईसाठी खरेदी केलेली गॉबलर मशीन धूळखात

साफसफाईसाठी खरेदी केलेली गॉबलर मशीन धूळखात

Subscribe

या मशीन खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झालेला निधी व्यर्थ गेला असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

भाईंदर :- मीरा- भाईंदर शहरात रस्त्यावर पडलेला कचरा लवकर गोळा करता यावा आणि रस्ते स्वच्छ राहावेत यासाठी महापालिकेने बॅटरीवर चालणारी स्वयंचलित बारा गॉबलर मशीन खरेदी केली आहेत. परंतु, या मशीनद्वारे रस्त्यावरील कचरा व्यवस्थित उचलला जात नाही. तसेच पाहिजे त्या वेगाने कचरा उचलता येत नाही. त्यामुळे या गॉबलर मशीन निरुपयोगी ठरत आहेत. त्यामुळे या मशीन वापराविना तशाच धूळखात पडून आहेत. या मशीन खरेदी करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च झालेला निधी व्यर्थ गेला असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

मीरा- भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी राज्य सरकारकडून मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत महापालिकेला बॅटरीवर चालणारी १२ गॉबलर मशीन खरेदी करण्यासाठी निधी मिळवून दिला. त्यावेळी बाजार भावापेक्षा जास्त किमतीने या मशीन खरेदी केल्याचा आरोप देखील झाला. परंतु या खरेदी केलेल्या मशीन आज कुचकामी ठरताना दिसत आहेत.
या मशीनवर शक्तिशाली व्हॅक्यूम पंप बसवण्यात आला आहे. त्याला जोडण्यात आलेल्या पाईपद्वारे रस्त्यावर पडलेली धूळ, कागद, प्लास्टिकच्या बाटल्या, धातूचे तुकडे खेचून यंत्रावरच असलेल्या टाकीत जमा होतो. हे यंत्र एक माणूस सहजपणे हाताळू शकतो. शिवाय, स्वयंचलित असल्यामुळे ते एका जागेवरून दुसर्‍या जागी नेता येते, असा दावा प्रशासनाने केला होता. शहरातील डांबरी रस्ते खाली वर असल्यामुळे तसेच दाट वस्तीमधील छोट्या गल्ल्यांमध्ये या मशीन प्रभावी काम करू शकत नाही. या मशीनपेक्षा कर्मचारी लवकर सफाई करतात, असे सफाई कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही यंत्रे वापरण्यास कर्मचारी इच्छुक नसून, ती बर्‍याच ठिकाणी विनावापर पडून आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया,

गॉबलर यंत्रांकडून नियमित स्वच्छता करून घेतली जाते. परंतु पाहिजे तशी साफ सफाई होत नाही. त्यामुळे या मशीन वापर मोठ्या प्रमाणात केला जात नाही. आता या मशीन भाजी मंडईच्या ठिकाणी वापरण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे.

- Advertisement -

– रवी पवार, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -