Eco friendly bappa Competition
घर पालघर अवजड वाहनांची घुसखोरी अपघातांचे प्रमुख कारण

अवजड वाहनांची घुसखोरी अपघातांचे प्रमुख कारण

Subscribe

याबरोबरच अवजड मालवाहू वाहने ही कार आणि लहान वाहनांसाठी असलेल्या उजव्या मार्गीकेत सर्रासपणे घुसखोरी करीत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत.

बोईसर : अवजड वाहनांची उजव्या लेनमधील घुसखोरी हे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.४८ हा देशातील सर्वात जास्त वाहतुकीने गजबजलेला महामार्ग समजला जातो.एकूण सहापदरी असलेल्या या महामार्गावरून रोज सरासरी २५ ते ३० हजार मालवाहू,खासगी आणि प्रवासी वाहने धावतात.वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच रोज होणार्‍या अपघाती घटनांनी हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे.घोडबंदर ते गुजरात सीमेवरील अच्छाड पर्यंतच्या १२० किमी अंतराच्या पट्ट्यात २०२२ या वर्षात जवळपास ३५० अपघात झाले असून यामध्ये १३० जणांचा मृत्यू तर ३५० जण जखमी झाले आहेत. महामार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा अभाव, पावसाळ्यात जागोजागी पडणारे खड्डे,बेशिस्त वाहनचालक आणि अतीवेग याबरोबरच अवजड मालवाहू वाहने ही कार आणि लहान वाहनांसाठी असलेल्या उजव्या मार्गीकेत सर्रासपणे घुसखोरी करीत असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत.

डावी आणि मधली मार्गिका ही प्रामुख्याने अवजड मालवाहू वाहनांसाठी असताना अनेक अवजड वाहने ही नियम तोडून सर्रासपणे हलक्या वाहनांसाठी असलेल्या उजव्या मार्गीकेतून धावताना दिसतात.यामुळे तिन्ही मार्गिका या एकाचवेळी बंद होऊन त्यामागे असलेली लहान वाहने पुढील वाहनांवर मागच्या बाजूने धडकून अथवा वेगाने पुढे जाण्यासाठी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नांत अपघातग्रस्त होत आहेत.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज बेंझ कारचा देखील चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नांत सूर्या नदी पुलाच्या कठड्याला धडकून अपघात झाला होता.तर ७ जानेवारी रोजी महालक्ष्मी येथे याच पद्धतीने झालेल्या वॅगन कारच्या अपघातात नालासोपारा येथील राठी कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी बळी गेला होता तर चार जण गंभीर जखमी झाले होते.

- Advertisement -

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अवजड मालवाहू वाहनांची उजव्या मार्गीकेतील घुसखोरी हे वाढत्या अपघातांचे प्रमुख कारण ठरत असताना महामार्ग पोलीस मात्र या बेशिस्त वाहतुकीकडे कानाडोळा करून दंडात्मक कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे महामार्गावर पुढे किती ही आवश्यक सुरक्षा उपाययोजना केल्या तरी अवजड वाहनांच्या उजव्या मार्गीकेतील घुखोरीवर प्रतिबंध घातल्याशिवाय अपघात घटना कमी होणे अवघड आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -