घरपालघरभाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक

भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक

Subscribe

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अशा काही लोकांमुळे एखादी मोठी गंभीर घटना घडल्यास त्याचा छडा लावणे पोलिसांना जिकरीचे होते.

बोईसर : बोईसर-तारापूर परिसरातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली असून सर्व भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर,सरावली,कोलवडे,कुंभवली,खैरापाडा आणि सालवड या ग्रामपंचायत क्षेत्राच्या हद्दीत तारापूर एमआयडीसी अंतर्गत लहान मोठे स्वरूपाचे जवळपास १२०० कारखाने कार्यरत आहेत.या कारखान्यांसोबतच इमारतींचे बांधकाम आणि इतर व्यवसायात स्थानिकांसोबतच बाहेरील राज्यातील हजारो परप्रांतीय कामगार काम करीत आहेत.यातील बरेचसे परप्रांतीय कामगार हे आपले कुटुंब मूळगावी सोडून औद्योगिक परिसरातील झोपडपट्टी भागामध्ये एकट्याने किंवा इतर कामगारांसोबत राहत आहेत.या परप्रांतीय नागरिकांना घर,सदनिका आणि जागा भाडे तत्वावर देताना घरमालक हे भाडेकरूच्या ओळखीबाबत कोणतीही शहनिशा न करता तसेच आवश्यक ओळखपत्र न घेता भाड्याने घरे देतात.यापैकी अनेक लोक हे अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारीमध्ये सामील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अशा काही लोकांमुळे एखादी मोठी गंभीर घटना घडल्यास त्याचा छडा लावणे पोलिसांना जिकरीचे होते.

बोईसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून चोरी,घरफोडी,अल्पवयीन मुलींवर अत्याचार,मुलींना फूस लाऊन पळवून नेणे यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.यामधील बहुतेक घटनांमध्ये बाहेरील नागरिकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांवर वचक ठेवण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी बोईसर उपविभागातील बोईसर एमआयडीसी,तारापूर आणि वाणगाव या पोलीस स्टेशनसाठी परप्रांतीय नागरिकांच्या ओळखीची माहिती संकलीत करण्याचे आदेश जारी केले आहेत.त्याचप्रमाणे घर मालक,सोसायटीचे अध्यक्ष,ब्रोकर आणि इस्टेट एजंट यांनी घर,सदनिका,दुकान,गाळे आणि जागा विक्री किंवा भाडेतत्वावर देताना पोलीस पडताळणी करणे बंधनकारक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -