घरपालघरमीरा भाईंदर महापालिका हद्दीतील खाडी गाव अद्यापही तहानलेलेच

मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील खाडी गाव अद्यापही तहानलेलेच

Subscribe

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत येणारे साठ-सत्तर घरांचे खाडी गाव पिण्याच्या पाण्यापासून अजूनही वंचित आहे. गावक-यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत येणारे साठ-सत्तर घरांचे खाडी गाव पिण्याच्या पाण्यापासून अजूनही वंचित आहे. गावक-यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सध्या टँकरच्या पाण्यावरच गावकरी आपली तहान भागवत आहेत. भाईंदर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उत्तन परिसरात खाडी गाव वसलेले आहे. तर महापालिका मुख्यालयापासून गाव अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. साठ-सत्तर घरे असलेल्या गावची लोकसंख्या तीनशेच्या घरात आहे. मात्र, महापालिकेच्या हद्दीत असून गावकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत. नळपाणी पुरवठा योजना नसल्याने दूरवर पायपीट करून पिण्याचे पाणी आणावे लागते. पदरमोड करून गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी खाजगी टँकरने पाणी मागवत आहेत. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही गावकऱ्यांची अद्याप तहान मिटू शकलेली नाही.

गावात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने लाखो रुपये खर्च करून पाईपलाईन टाकलेली आहे. मात्र, उच्च दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी पंपरुम बांधावा लागणार आहे. त्यासाठी जागा नसल्याने गावकरी पाण्यापासून वंचित आहेत. पंपरूमचे काम मार्गी लावून गावकऱ्यांना नळाद्वारे पिण्याचे पाणी लवकर द्यावी, अशी वारंवार मागणी करत आहे.
– शर्मिला बगाजी, स्थानिक नगरसेविका

- Advertisement -

खाडी गावच्या अलिकडे प्रसिद्ध केशवसृष्टी अर्थात रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान वसलेले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशवसृष्टीत रेस्ट हाऊस, स्विमिंग पूल, शाळा यासह विविध प्रकल्प आहेत. त्याठिकाणी महापालिकेने नळाव्दारे पाणी पुरवले आहे. तसेच केशवसृष्टी परिसरातील गावांनाही महापालिकेने नळाव्दारे पाणी पुरवले आहे. पण, केशवसृष्टीलाच लागून असलेले खाडी गाव अद्यापही तहानलेलेच आहे.

खाडी गाव 1

गावकऱ्यांना नळ कनेक्शनसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. नळ कनेक्शन मंजूर झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल. शहरात ज्याज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे, त्याठिकाणी महापालिका पाणी देण्यास कटीबद्ध आहे.
– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

- Advertisement -

अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर दोन वर्षांपूर्वी पाईपलाईन रस्त्याखालून टाकण्यात आली आहे. परंतु अजून त्यामधून पाणी सुरू झालेले नाही. अद्याप घरांपर्यंत नळ कनेक्शन देण्यात आलेले नाहीत. महापालिका गावकऱ्यांकडून मालमत्ता कर वसूल करते. पण, गावकऱ्यांची तहान का भागवत नाही, असा प्रश्न स्थानिक रहिवाशी अतुल साटम यांनी उपस्थित केला आहे. पाणी जीवनावश्यक बाब असून तो नागरीकांचा हक्क आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार, असा सवालही साटम यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा –

खुशखबर, ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृह सुरू होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -