Thursday, February 18, 2021
27 C
Mumbai
घर पालघर वाढवण बंदराविरोधात कोळीवाड्यात कडकडीत बंद

वाढवण बंदराविरोधात कोळीवाड्यात कडकडीत बंद

Related Story

- Advertisement -

वाढवण बंदराविरोधात मंगळवारी मच्छीमार संघटनांनी पुकारलेल्या कोळीवाडा बंदला पालघर जिल्ह्यातील कोळीवाड्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी वसई, पालघर आणि डहाणू तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व गावांमधील मच्छी मार्केटही बंद ठेवण्यात आली होती.

केंद्र सरकारने डहाणू तालुक्यातील वाढवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदराला गेले अनेक वर्षांपासून तीव्र विरोध सुरु असताना भाजप सरकारने बंदराच्या कामासाठी सर्वे सुरु केला आहे. त्याविरोधात गावकरी लढा देत आहेत. मंगळवारी विविध मच्छीमार संघटनांनी गुजरातच्या झाईपासून ते थेट मुंबईतील कफ परेड येथील कोळीवाड्यात बंदची हाक दिली होती. पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर असलेल्या कोळीवाड्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. पाचूबंदर, किल्लाबंदर, कळंब, राजोडी, अर्नाळा, दातिवरे, माहिम, वडराई, सातपाडी, चिंचणी, तारापूर, धाकटी डहाणू, डहाणू, बोर्डी, वरोर, चिंचणी या मोठ्या गावांसह सर्वच गावांध्ये कडकडीत बंद होता. यावेळी गावागावातील मच्छी मार्केटही बंद होते. रिक्क्षा वाहतूक, दुकानेही बंदमध्ये सहभागी झाले होते. किनारपट्टीवर रिसॉर्टही बंद होती.

- Advertisement -

अनेक गावांमध्ये मानवी साखळी तयार करण्यात आली होती. तर मच्छीमार महिला हातात झेंडे घेऊन समुद्रकिनारी वाढवणच्या विरोधात घोषणा देताना पहावयास मिळाल्या. काही गावांमधील तरुणांनी मुंडण करून वाढवण बंदराला विरोध केला. वाढवण येथील मुंडेश्वरी मंदिराबाहेर वाढवण बंदराच्या विरोधात बाळकृष्ण पाटील, कमलेश किणी, सुनील राऊत आणि भुवनेश्वर पाटील या तरुणांनी मुंडन करून पिंडदान केले. या बंदच्या पार्श्वभूमीवर गावागावात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. मात्र, गावकर्‍यांनी शांततापूर्वक बंदमध्ये सहभाग नोंदवला होता.

भाईंदरमधील उत्तन, पाली, चौक परिसरातील मच्छीमारांनी बंदमध्ये सहभागी होऊन माशांची खरेदी-विक्रीचा व्यवहार बंद ठेवला होता. गावकर्‍यांनी काळे झेंडे दाखवून बंदराला विरोध केला. यात मच्छीमार महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. खबरदारी म्हणून या भागात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- Advertisement -

जिल्ह्यातील आदिवासी आमदारांचा वाढवणला विरोध
महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या वाढवण बंदराच्या विरोधात जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील भुसारा आणि बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द, अशा स्वरूपाचे बॅनर झळकवत निषेध व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील या तीन आदिवासी आमदारांचा आवाज विधिमंडळासमोर गाजल्याने वाढवण बंदराचा विरोध आता अधिक तीव्र झाल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -