घरपालघरडोमिहीरा’ प्रकल्पाला गळती, हजारो लिटर्स पाणी वाया

डोमिहीरा’ प्रकल्पाला गळती, हजारो लिटर्स पाणी वाया

Subscribe

डोमझिरा प्रकल्पाच्या धरणाची गळती व डागडुगी वेळीच न केल्यास हे धरण फुटून दुर्घटना होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

मोखाडा : पालघर जिल्ह्यात उन्हाळ्याच्या काळात भेडसावणार्‍या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी, तसेच जमिनीच्या भूगर्भातील पाणी साठ्यात वाढ व्हावी, या उद्देशाने पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यातूनच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील डोमिहीरा नदीवर जलसंपदा विभाग प्रकल्पांतर्गत धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत बांधलेल्या धरणातील पक्षीभिंतीतून पाण्याची मोठी गळती सुरू आहे. त्यानंतर गळती बंद करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी दीड कोटी रुपये खर्च करूनही गळती बंद झाली नाही.डोमझिरा प्रकल्पाच्या धरणाची गळती व डागडुगी वेळीच न केल्यास हे धरण फुटून दुर्घटना होण्याची शक्यता येथील ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

पालघर जिल्ह्यातील, जव्हार तालुक्यात डोमिहीरा नदी प्रकल्पावर खडखड धरण जलसंपदा विभागाकडून १३ वर्षांपूर्वी बांधण्यात आले. दुर्गम आदिवासी भागातील खडखड गावात डोमी नदी प्रकल्पात हे धरण बांधण्यात आल्याने याला खडखड धरण म्हणून देखील संबोधिले जात आहे. धरणाचा उजवा कालवा सुमारे १७ किलोमीटर लांबीचा असून, जव्हारमधील खडखड, मोरगिर, वांगणपाडा, पिंपळगाव, धरामपूर, न्याहळे ही गावे तर मोखाड्यातील रायतळे गावातील ६८५ हेक्टर जमीन सिंचनाखाली प्रस्तावित आहे. या धरणाची साठवण क्षमता १४.४९ दलघमी असून, उपयुक्त पाणी १३.८५ दलघमी इतके आहे, पण अशा महत्त्वपूर्ण धरणाला गळतीचे ग्रहण लागले आहे. या धरणाचे मातीकाम फेब्रुवारी २००२ पासून सुरू करण्यात आले असून घळभरणीचे काम मे २००९ मध्ये पूर्ण झाले. तसेच सांडव्याचे मूळ काम मे २०१० मध्ये पूर्ण झाले आहे. त्यानंतर धरणामध्ये पूर्णक्षमतेने पाणीसाठा करण्यास सुरुवात झाली. अशातच २०१२ मध्ये सांडव्यातून व पक्षीभिंतीतून पाणी गळती होत असल्याचे आढळले होते. त्यानुसार गळती प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर गळती बंद करण्यसाठी दीड कोटी खर्च देखील केला मात्र, तरी देखील पाणी गळती थांबलेली नाही.त्या अनुषंगाने जलसंपदा विभागाकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने शासनाकडे दिलेल्या अहवालात सांडव्याचे काम सदोष झाले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदारावर कारवाई करत १२.७० लक्ष रुपये दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली.

- Advertisement -

 

पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान.

- Advertisement -

दामणगंगा खोर्‍यात वाहणार्‍या डोमिहीरा नदीवर बांधलेल्या या धरण परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गुजरात, महाराष्ट्रातून पर्यटक फिरण्यासाठी येतात. सर्वांच्या आकर्षणाचे पर्यटन स्थळ झालेल्या धरणाच्या विभाजक भिंतीतून कायम पाणी झिरपत आहे. मुसळधार पाऊस पडल्यावर धरणाच्या भिंतीतून ठिकठिकाणी पाण्याचे झरे निर्माण होतात. तसेच वर्षांचे बाराही महिने भिंतीतून पाणी झिरपत आहे.

सुमारे १०० शेतकर्‍यांची जमीन संपादित

धरणाच्या निर्मितीसाठी खडखड, खरवंद, बोरहट्टी या आदिवासी गावातील सुमारे १०० शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात एकरी केवळ अकरा हजार देण्यात आले. कवडीमोल भावाने आमच्या जमिनी सरकारने घेतल्या. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. या धरणाचा फारसा उपयोग होत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी देखील उन्हाळ्यात वणवण होते. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या विभाजक भिंतीतून पाणी गळती होते. तसेच धरणातील पाण्यापासून वीज निर्मिती प्रकल्प ही सुरू झाला नसल्याची माहिती स्थानिक शेतकरी सदाशिव राऊत यांनी दिली.

मोठी गळती बंद करावी.

धरणाची दुरुस्ती करून, वितीमधून होणारी पाणी गळती पूर्णपणे थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. तज्ज्ञ समितीने शिफारस केलेल्या उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच सांडव्याचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर पक्षीभिंतीची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती पालघर जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

दररोज वाया जाणार पाणीसाठा.

दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे खडखड धरणापासून पासून 7 किमी अंतर असलेल्या जव्हार शहराला या धरणातून पाणी 1.28 द.ल.मी.मी इतके पाणीसाठा आरक्षित करण्यात आले आहे. सध्या जव्हार शहरात पाणी योजनेचे काम सुरू आहेत.शासनाचे132 कोटी रुपये नुकसान झाले आहे व धरणाचा कोणत्याही प्रकारचा फायदा हा जव्हार तालुक्यात कोणालाही झाला नसल्याचे दिसून येते

&…………….

धरण बांधण्यासाठी 132 कोटी रुपये कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत खर्च करण्यात आले .मात्र धरण जर चांगल्या रीतीने पूर्ण झाले असते तर आदिवासी भागातील पाण्याचा प्रश्न सुटला असता. मात्र सरकारी अधिकारी व ठेकेदार यांच्यामुळे सदर योजना फोल ठरली. आजही मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य या भागात आहे. त्यामुळे दोषींवर कारवाई कधी होणार असा प्रश्न आहे.

ड.पारस सहाणे
अध्यक्ष-जव्हार पर्यटन विकास संस्था
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -