वसईः रविवारी रात्री वसई ते भाईंदर दरम्यान नुकत्याच सुरु झालेल्या रो-रो प्रवासी फेरीबोटीत चक्क दारुची पार्टी झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकार्यांनी बोट खासगी असून मालकानेच ठेकेदाराला पार्टीची परवानगी दिल्याचे सांगत हात झटकले आहेत. त्यामुळे आता फेरीबोटीत रात्रीच्यावेळी पार्ट्या झडणार की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. रविवारी रात्री भाईंदर जेट्टीजवळ उभ्या असलेल्या आरोही नावाच्या फेरीबोटीत संगीताच्या जोरदार आवाजात दारुची पार्टी सुरु असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर वायरल झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘आरोही’ नावाच्या फेरीबोटीत रात्रीच्या सुमारास तरुण जोरात गाणी लावून मद्यपान करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ही व्हिडीओ वायरल झाल्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीसाठी असलेल्या फेरीबोटीत रात्रीच्यावेळी दारुची पार्टी झाल्याने बोटीच्या सुरक्षितते बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही व्हिडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर पत्रकारांनी महाराष्ट्र सागरी मंडळाचे कार्यकारी अभियंता अविनाश पाटील यांच्याच्या निदर्शनास ही बाब आणली असता त्यांनी थेट हात वर केले. प्रवासी सरकारी नसून खासगी आहे. ही पार्टी प्रवासी सेवेदरम्यान घडलेला नाही. बोट मालकानेच ठेकेदाराला बोटीवर वाढदिवस साजरा करण्याची परवानगी दिली होती. त्यात काहींनी मद्यपान केले असले तरी प्रवासी वाहतूक संपल्यानंतर बोटीचा वापर कसा करायचा, हा सर्वस्वी बोटमालकाचा अधिकार आहे, अशी धक्कादायक प्रतिक्रीया पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारीच असे उत्तर देत असल्याने यापुढे बोटमालक सेवा संपल्यानंतर बोट पार्टी करण्यासाठी भाड्याने देऊ लागले तर अनेक प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे.