घरपालघरपालघर जिल्हापरिषदेच्या सर्व साधारण सभेत गोंधळ

पालघर जिल्हापरिषदेच्या सर्व साधारण सभेत गोंधळ

Subscribe

पालघर जिल्हा परिषदेच्या गेल्या सात वर्षांच्या काळातील गुरुवारची सर्वसाधारण बैठक आठवणीत ठेवण्यासारखी होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली धुसफूस प्रत्यक्षातील आरोपांमध्ये झाली.

पालघर :  जिल्हा परिषदेत झालेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी प्रचंड गदारोळ झाला. अधिकारी विरुद‍्ध सदस्य तसेच सत्ताधारी व विरोधक हे एकमेकांची उणीदुणी काढताना दिसले. पालघर जिल्हा परिषदेच्या गेल्या सात वर्षांच्या काळातील गुरुवारची सर्वसाधारण बैठक आठवणीत ठेवण्यासारखी होती. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली धुसफूस प्रत्यक्षातील आरोपांमध्ये झाली. जनतेच्या हिताचा एकही निर्णय यावेळी घेतला न गेल्याने पालघर जिल्हातील जनतेतून नाराजी व्यक्‍त होत आहे.

सर्वप्रथम राष्ट्रवादीचे संदेश ढोणे यांनी इतिवृत्तातील चुका सभागृहाच्या निदर्शनास आणून देत असताना त्यांच्या वक्‍तव्याला समर्थनही मिळत असल्याने अधिकारी भांबावून गेले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या बैठकीत एकाही निर्णायक प्रश्‍नावर चर्चा झाली नसल्याने इतर सदस्यांनीही नाराजी व्यक्‍त केली आहे. यात्रास्थळ निधी वितरण करताना ठरावीकच सदस्यांना निधीचे वाटप करण्यात आले आणि त्याची जाहीर वाच्चता करण्यात आल्याने कुणा सदस्याला किती निधी वितरित करण्यात आला आणि अन्य सदस्यांच्या तोंडाला कशा प्रकारे पाने पुसण्यात आली याचा पाढाच वाचण्यात आल्याने सुरुवातीपासूनच गदारोळ झाल्याने ही सभा सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान थांबवावी लागली. उपस्थित सर्व सदस्यांनी सभागृह चालू देणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने बैठकीचे गांभीर्यच निघून गेले होते.

- Advertisement -

पत्रकारांना परवानगी
जिल्हा निर्मितीपासून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत पत्रकारांना वृत्तांकन करण्यासाठी मज्जाव करण्यात येत असे. मात्र, जिल्ह्यातील पत्रकारांची सतत मागणीनंतर या बैठकीला बोलावण्यात आले होते. यापूर्वी गदारोळाचा प्रकार घडला नसल्याचे सांगून यावेळी काही सदस्यांच्या वागणुकीत असंस्कृतपणा दिसून आला. तसेच गैरहजर अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. सदस्य एकमेकांवर डाफरताना दिसत होते. त्यामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण याची कल्पनाही दिसून आली नाही. सत्ताधारी पक्ष एकमेकांची उणीदुणी काढण्यात तसेच अधिकारी आणि सदस्यांमध्ये असलेला कामांवरून वाद चहाट्यावर दिसून आला.

निधी वाटपात राजकारण
जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि शिक्षण विभाग भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप करण्यात आला. ठरावीक सदस्यांनाच फक्‍त निधी वाटप करण्यात आले असून उर्वरित सदस्यांनी आपल्या गटात कामेच करायची नाही का, असा सवाल उपस्थित केला आणि प्रत्येक सदस्याने आपल्या भागातील समस्यांचा पाढाच वाचायला सुरुवात केली. ज्यांना निधी वाटप झाला त्यांचा नामोल्‍लेख करण्यात आला आल्याचा ठपका अधिकारी आणि पदाधिकार्‍यांवर करण्यात आला. बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, विरोधी पक्षनेत्या सुरेखा थेतले, बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर, शिवसेनेचे गटनेते जयेंद्र दुबळा आदींनी चर्चेत भाग घेतला.

- Advertisement -

अधिकारी – सदस्यांचा वेळ वाया
पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत सायंकाळपर्यंत एकही निर्णय घेण्यात आला नव्हता. अधिकारी विरुद‍्ध पदाधिकारी, पदाधिकारी विरुद‍्ध सत्ताधारी, सत्ताधारी विरुद‍्ध सत्ताधारी असा सामना प्रथमच पाहायला मिळाला. जनतेच्या प्रश्‍नांची काळजी नसलेल्या या सदस्यांबाबत सर्वत्र नाराजी व्यक्‍त होत आहे. लाखमोलाचा वेळ अधिकारी आणि सदस्यांनी वाया घालविल्यामुळे जनतेतून संताप व्यक्‍त होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -