घरपालघरभरारी पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस

भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस

Subscribe

सार्वजनिक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकातील कर्मचारी कारवाई करीत नसल्याने महापालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

सार्वजनिक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकातील कर्मचारी कारवाई करीत नसल्याने महापालिकेने त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. कामात सुधारणा न झाल्यास संबंधितांवर कारवाई करून त्याची नोंद सेवापुस्तकात करण्यात येईल, असा सज्जड इशारा उपायुक्तांनी दिला आहे. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच कामगार संघटनेने त्याला आक्षेप घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने प्रभागनिहाय एकूण ५७ भरारी पथके तयार केली आहेत. सहाय्यक आयुक्त आणि पथक प्रमुख, नियंत्रण अधिका-यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या भरारी पथकांमध्ये ७२ कर्मचा-यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यात लिपिक, शिपाई, सफाई कामगारांचा समावेश आहे. मॉर्निग वॉक करणारे, शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पथकाला देण्यात आले आहेत. त्याचबरोबर दुकानदार, शॉपिंग मॉल, मंगल कार्यालये यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकारही भरारी पथकाला देण्यात आले आहेत.

या पथकातील कर्मचाऱ्यांना दररोज पंधरा हजार रुपये दंड वसूल करण्याचा टार्गेट देण्यात आले आहे. पण, ही वसुली होत नसल्याने प्रशासनाने त्यांच्यावरच कारवाईचा बडगा उगारला आहे. पथकातील कर्मचारी नेमून दिलेले काम करीत नसून दंडात्मक कारवाईही करीत नाहीत. सोपवलेल्या जबाबदारीचे पालन न करता कामात चालढकल केली जात असल्याने वसुलीचा इष्टांक पूर्ण केला जात नाही. ही कामगिरी असमाधानकारक असून दररोज जास्तीत जास्त लोकांवर, आस्थापनांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड लावून दंडाची वसूली करण्याचे प्रयत्न करावेत. आपल्या कामात सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. सदरची नोंद आपल्या सेवा पुस्तकात घेण्यात येईल, असे उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी पाठवलेल्या नोटीसीत बजावण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, महापालिकेच्या या तुघलकी नोटीसीला झुंज जनरल कामगार युनियनने तीव्र विरोध केला आहे. ही पथके आपत्ती काळात नियम तोडणाऱ्यांवर दंड वसुली करण्यासाठी नेमलेली आहेत. ही पथके महापालिकेची थकबाकी वसुली करणारी पथके नाहीत. मग यात इष्टांक कसे असू शकते. कर्मचारी दिवसाला १५ हजार रुपये जबरदस्ती वसूल कसे करणार. ही वसुली म्हणजे महापालिकेचे उत्पन्नाचे साधन नसल्याने इष्टांक गाठणे सक्तीचे करणे चुकीचे असल्याचे युनियनचे अध्यक्ष अमित भोसले यांनी महापालिकेला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. संपूर्ण जग घरात असताना कर्मचारी आपत्ती काळात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. अशावेळी त्यांचे मनोबल वाढवण्याऐवजी कारणे दाखवा नोटीसा बजावून कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केल्यासारखे होईल, असेही भोसले यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

Live Update: टाइम्स ग्रुपच्या अध्यक्षा इंदू जैन यांचे ८४ व्या वर्षी निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -