घरपालघरमीरा- भाईंदरमध्ये पोलीस भरतीला सुरुवात

मीरा- भाईंदरमध्ये पोलीस भरतीला सुरुवात

Subscribe

संपूर्ण प्रक्रिया जलद व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

इरबा कोनापुरे,भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई विरार पोलिसांच्या शिपाई व चालक पदांसाठी २ जानेवारीपासून थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात पोलीस भरती सुरू केली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच थेट भरती होत आहे. ९९६ पोलीस पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी सुमारे ७१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी व उमेदवारांवर लक्ष ठेवण्यासाठी जवळपास ५० कॅमेरे लावण्यात आले असून पोलीसांचे सीसीटीव्ही, भरती प्रक्रिया पार पाडणार्‍या कंपनीचे कॅमेरे व हँडीकॅम कॅमेर्‍याद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रियेवर कॅमेर्‍याची बारिक नजर असणार आहे. ही प्रक्रिया जवळपास दोन महिने सुरु राहाणार आहे. संपूर्ण प्रक्रिया जलद व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

सकाळी ५.३० वाजता उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यात प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रीक हजेरी घेतली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला चेस्ट क्रमांक दिला जाईल व त्यात संगणकीय चीप बसविण्यात येणार आहे. सर्वप्रथम उमेदवाराची उंची व छाती मोजली जाणार आहे व या मोजणीत पात्र ठरणार्‍या उमेदवारालाच पुढील चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. पुरुष उमेदवाराला १६०० मीटर व १०० मीटर धावणे व गोळाफेक तसेच महिला उमेदवारांना ८०० मीटर व १०० मीटर धावणे व गोळाफेक या चाचण्यांचा समावेश आहे. हैदराबादच्या “ई सॉफ्ट” या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.

- Advertisement -

…तर माहिती पोलीसांना द्यावी

भरतीसाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली, मुख्यालय उपायुक्त, तीन सहाय्यक आयुक्त, २१ पोलीस निरीक्षक, ३६ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरिक्षक आणि २३१ पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरतीसाठी कोणीही पैशांची मागणी करत असेल तर उमेदवारांनी तातडीने त्याची माहिती पोलीसांना द्यावी असे जाहीर आवाहन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -