जायशेत-बहिरीफोंडा रस्त्याची दुरवस्था

जायशेत-बहिरीफोंडा रस्त्याची रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. सात वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याचा देखभाल दुरुस्ती कालावधी पूर्ण होऊन २० महिने उलटले आहेत.

वांद्री धरणाच्या बुडीत क्षेत्रातील दुर्गम भागाला जोडणाऱ्या जायशेत-बहिरीफोंडा रस्त्याची रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. सात वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार केलेल्या रस्त्याचा देखभाल दुरुस्ती कालावधी पूर्ण होऊन २० महिने उलटले आहेत. दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने जायशेत-बहिरीफोंडा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जायशेत ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूर पाडा, बहिरीफोंडा आणि पाचामोहा या दुर्गम भागातील आदिवासी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत गांजे ढेकाळे ग्रामपंचायत हद्दीतील वांद्री धरणाच्या बुडीत क्षेत्रालगतच्या दुर्गम भागात जायशेत, बहिरी फोंडा आणि ठाकुरपाडा ही आदिवासीबहुल वस्ती असलेली गावे वसली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या गावांमध्ये जाण्यासाठी पोहोच रस्ता उपलब्ध नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांना घनदाट जंगलातून पायी तसेच धरणाच्या पाण्यातून बांबूच्या तराफ्याच्या सहाय्याने जीवघेणा प्रवास करून गांजे गाव गाठावे लागत होते.

जायशेत बहिरीफोंडा रस्त्याची देखभाल दुरुस्तीची मुदत मे 2020 मध्ये संपली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी विशेष दुरुस्ती प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.निधी उपलब्ध होताच दुरुस्ती करण्यात येईल.
– रुपेश गवळी, उपअभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभाग

सात वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ६ कोटी ८६ लाख रुपये खर्चून गांजे गावापासून जायशेत-बहिरीफोंडा गावापर्यंत साडेआठ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता. मे २०१५ मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतरच्या पाच वर्षात जायशेत बहिरीफोंडा रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची मुदत मे २०२० मध्ये संपल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे साडेआठ किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी पाच ते सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्ती अभावी जायशेत बहिरीफोंडा रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे ग्रामस्थ आणि पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.

वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची पसंती

जायशेत-बहिरीफोंडा रस्ता तयार झाल्यापासून पावसाळ्यात वांद्री धरणावर येणारे पर्यटक बहिरी फोंडा ठाकुरपाड्याचे निसर्ग सौंदर्य आणि फेसळणाऱ्या धबधब्यांवर चिंब भिजण्याचा आनंद घेताना दिसतात. मुंबई आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पर्यटक मोठ्या संख्येने याभागात येत असतात. त्यामुळे वांद्री धरण, बहिरीफोंडा ठाकूर पाडा भागाची पालघर तालुक्यातील नवीन टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून ओळख तयार होत आहे.

हेही वाचा –

बबनराव लोणीकरांनी अखेर वीजबिल भरलं, महावितरणाने कापली होती वीज