घरपालघरनव्या नळजोडण्यांना स्थगिती

नव्या नळजोडण्यांना स्थगिती

Subscribe

निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाचा निर्णय

वसई विरार महापालिका प्रशासनाने पाणी टंचाई लक्षात घेऊन नव्या नळजोडण्या देण्यास स्थगिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाने हा निर्णय घेऊन सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला धक्का दिल्याचे मानले जाते.
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून वसई विरार महापालिका हद्दीत पाणी टंचाई डोके वर काढले आहे. गेल्या महिन्यात धुकटण येथे तब्बल २४ वेळा वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यातच अनेकदा पाईपलाईन फुटल्या होत्या. त्यामुळे गेले दीड-दोन महिने वसईच्या अनेक भागात चार-पाच दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. तोही अनियमित आणि कमी दाबाने होत असल्याने पाणी टंचाईने नागरीक त्रस्त झाले आहेत.

ही डोकेदुखी वाढली असतानाच महापालिका प्रशासक गंगाथरन डी. यांनी पुढील आदेश होईपर्यंत नव्या नळजोडण्या देण्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. महापालिकेची लोकसंख्या व सर्व स्त्रोतातून मिळणारे पाणी यासह उन्हाळ्यात धरणातील शिल्लक पाणी साठा जूनअखेरपर्यंत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून नव्या नळजोडण्या दिल्या जाणार नाही, असे प्रशासक गंगाथरन डी. यांचे म्हणणे आहे. पाणी पुरवठा विभागाच्या अहवालावरून सध्या महापालिकेला भासणारी पाण्याची तूट विचारात घेता पावसाळ्यापर्यंत पाण्याचे सुनियोजन होण्यासाठी नव्या नळजोडण्या मंजूरीची प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. प्रभाग स्तरावरील प्राप्त होणाऱ्या नळजोडणी मागणी अर्ज करणाऱ्या अर्जधारकांना अवगत करून प्रलंबित अर्ज पुढील आदेश होईपर्यंत मुख्यालयात सादर करण्यात येऊ नयेत, असे आदेश प्रशासक गंगाथरन डी. यांनी नऊही प्रभाग समित्यांना दिले आहेत.

- Advertisement -

सूर्या धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. उसगाव आणि पेल्हार धरणात तीन महिने पुरेल इतका पाणी साठा शिल्लक आहे. उन्हाळ्यामुळे पाणीसाठयावर परिणाम होत असतो. दुसरीकडे, पाऊस लांबला तर पाण्याची तीव्र टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नव्या नळजोडण्या देण्याचे काम थांबवले आहे. वसई विरार महापालिका हद्दीत सूर्या, पेल्हार आणि उसगाव धरणांमधून दररोज २३० एमएलडी पाणीपुरवठा होतो. पण, पाणी गळती पाहता प्रत्यक्षात मात्र दररोज १९० एमएलडीच्या आसपासच पाणी पुरवठा होतो. महापालिकेची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक झाली असून प्रत्यक्षात दररोज ३२६ एमएलडी पाण्याची गरज आहे. यावर उपाय म्हणून गेले कित्येक वर्षांपासून महापालिकेकडून दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वसईतील अनेक भागात कायम पाणी टंचाई जाणवत असते.

नळ कनेक्शनच्या माध्यमातून सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने आतापर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकण्याचे काम केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर इतकेच काय निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत नळकनेक्शन लावण्याची कामे होत असल्याचे पहावयास मिळत असते. पण, प्रशासक गंगाथरन डी. यांनी नळजोडण्या देण्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा निर्णय घेतला गेल्याने यामागे शिवसेनेचे राजकारण असल्याची चर्चाही सुरु आहे. परिणामी निवडणुका लागल्या तर मात्र बहुजन विकास आघाडीला डोकेदुखी होणार हे निश्चित.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -