ऑपरेशन ऑल आऊटमध्ये सात आरोपी जेरबंद

सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबवण्यात आली.

पालघर : पालघर जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेत कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी केली. या कारवाईत सात फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. तर दारुबंदी, अंमली पदार्थ विरोधी गुन्हयांसह दखलपात्र व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑल आऊट मोहिम राबवण्यात आली.
जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांच्या हद्तीतील ३२ महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगारांचे आश्रयस्थान असलेल्या एकूण २१ वस्त्यांमध्ये एकाचवेळी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी अ‍ॅक्शन टिम हंटर टिमच्या पथकाने कोम्बिंग ऑपरेशनमध्ये संपूर्ण क्षेत्र पिंजून काढले. या कारवाईत सात फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्याचप्रमाणे अंमली पदार्थविरोधी कायद्याप्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच दारुबंदी कायद्याप्रमाणे ३३ गुन्हे दाखल करून 12 लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नाकाबंदीत ९२ वाहन धारकांवर कारवाई करून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत पोलीस अधिक्षकासह ६८ पोलीस अधिकारी आणि २९७ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.