घरपालघरवसई विरार महापालिकेवर हंडा कळशी मोर्चा

वसई विरार महापालिकेवर हंडा कळशी मोर्चा

Subscribe

अनेक भागात चार चार दिवस पाणी नाही

नगरसेवक आणि वॉलमनच्या मनमानी कारभारामुळे वसई विरार परिसरावर पाणी टंचाईचे संकट असून यावर त्वरीत उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने वसई विरार महापालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील नागरिकांना गेली अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात चार चार दिवस पाणी येत नाही. मनपाचे (वॉलमन) पाणी सोडणारे कर्मचारी काही नगरसेवकांच्या सांगण्यावरून ठराविक विभागात कमी पाणी सोडतात. त्यांच्याच सांगण्यावरुन कमी दाबाने पाणी सोडले जाते, ज्या सोसायट्या वॉलमनच्या आर्थिक मागण्या पूर्ण करतात, अशा सोसायट्यांना मुबलक पाणी मिळते व ज्या सोसायट्या मागण्या पूर्ण करत नाहीत, त्यांना पाण्यापासून वंचित ठेवण्यात येते. वॉलमनच्या मनपाने बदल्या करण्यात आल्यानंतरही ते आपल्या मूळ जागी कायम असल्याने प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने बुधवारी वसई-विरार महापालिकेवर ‘हंडा-कळशी मोर्चा काढण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी दिली.

- Advertisement -

मनवेल पाडा, कारगिल नगर, नाना-नी पार्क, जांगीड़ कॉम्प्लेक्स आदी भागात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चार दिवसाआड़ येणाऱ्या पाण्यामुळे महिला वर्ग हैराण झाला आहे. मात्र महापालिकेकडून यावर कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. मनवेल पाडा, कारगिल नगर, नाना-नी पार्क आदी भागात मोठ्या प्रमाणात लोडबेअरिंग इमारती आणि चाळी आहेत.

लाखो वस्तीच्या या भागात प्रत्येक चाळी किंवा इमारतींनुसार नळ कनेक्शन आहेत. काही चाळी किंवा इमारतीना तर अद्याप नळ कनेक्शन मिळालेली नाहीत. परिणामी १०-१० रुम एका नळ कनेक्शनवर अवलंबून असतात. यात एक तास पाणी येणार असेल तर या १० रुमना तितक्या मिनिटे विभागून पाणी घ्यावे लागते. यात बहुतांश वेळ महिलांचा पाणी भरण्यात जातो. कित्येक वेळा तर रात्री-अपरात्री पाणी सोडण्यात येत असल्याने महिलांना रात्रीही नाहक त्रास सोसावा लागतो, असा आरोप जाधव यांनी केला आहे. मागील महिनाभर चार दिवसाआड पाणी येत असल्याने महिलावर्ग प्रचंड त्रासला आहे. या संदर्भात अनेक महिलानी स्थानिक नगरसेवक व पालिका प्रशासनाकड़े विचारणा केली असली तरी याबाबत योग्य उत्तर मिळत नसल्याची जाधव यांची तक्रार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -