गाड्या नादुरूस्त, प्रवासी त्रस्त आणि प्रशासन स्वस्थ

कोणतेही सरकार राज्य परिवहन विभागाचा गांभीर्याने विचार करीत नसल्याने एसटीला घरघर लागून जनतेचे हाल होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.

डहाणू : एकीकडे राज्य परिवहन विभाग आर्थिक समस्यांचा सामना करत आहे,त्यात आता खराब रस्त्यांमुळे डहाणू बस आगारात एसटी गाड्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. या अशा डबघाईला आलेल्या गाड्यांमुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या तर नोकरदारांना कामाच्या वेळा पाळणे मुश्किल बनले आहे. तसेच चालक व वाहक अशा सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणतेही सरकार राज्य परिवहन विभागाचा गांभीर्याने विचार करीत नसल्याने एसटीला घरघर लागून जनतेचे हाल होत असल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे.
ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतुकीचा भार आजही राज्य परिवहन विभागावरच असून आदिवासी पाड्यांपर्यंत एसटीचे जाळे पसरले आहे. डहाणू बस आगारातून डहाणू, बोर्डी, तारापूर, कासा, तलासरी आणि पर जिल्ह्यात एसटी सेवा पुरवली जाते. तर विविध शाळा व महाविद्यालयांच्या वेळापत्रकांनुसार सवलतीच्या दरात फेर्‍यांचे नियोजन केले आहे. दरम्यान काही वर्षांपासून या आगाराच्या एसटी गाड्या प्रवासात नादुरुस्त होत असून पावसाळ्यात हे प्रमाण अधिकच वाढले आहे. शहरांप्रमाणेच खेडेगावातील चाळण झालेले रस्ते हे त्यामागील महत्वाचे कारण आहे. खराब रस्त्यांमुळे काही गावातील फेर्‍या बंद करण्यात आल्या.

धार्मिक पर्यटनावरही परिणाम
गतवर्षी नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर डहाणू ते नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी फेरी सुरू केली होती. यंदा मात्र ही सेवा नसल्याने धार्मिक पर्यटनावरही परिणाम झाला आहे. या मार्गावर एसटी व्यतिरिक्त अन्य पर्याय नसल्याने अडचणीचा सामना करावा लागतो. शिवाय अनेक वर्षांपासून नवीन एसटी गाड्या आगाराच्या ताफ्यात न आल्याने जुन्या गाड्याच वाहतुकीचा भार वाहत आहेत. अनेकदा दुरुस्ती करून धावणारी वाहने प्रवासात बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून विद्यार्थी आणि नोकरदारांना त्याचा भुर्दंड सोसावा लागतो.