घरपालघरजिल्हाधिकार्‍यांकडून अधिकार्‍यांची कानउघडणी

जिल्हाधिकार्‍यांकडून अधिकार्‍यांची कानउघडणी

Subscribe

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तातडीने रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेत महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यानंतर महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल पाहायला मिळाले आहेत.

पालघर: मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर 4 सप्टेंबर रोजी चारोटी येथील सूर्या नदीच्या पुलाच्या कठड्याला धडकून टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली. मिस्त्रींच्या मृत्यूने जवळजवळ सर्वच शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अनेक शासकीय,निमशासकीय यंत्रणा आणि एनजीओ कामाला लागल्या. मिस्त्रींच्या वाहनाचा अपघात नेमका कसा झाला असावा ह्याची कसून चौकशी झाली आणि चौकशी अंती फॉरेन्सिक टीमने दिलेल्या अहवालानुसार महामार्गाच्या चुकीच्या आराखड्यामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. फॉरेन्सिक टीमने दिलेल्या अहवालानुसार महामार्गाच्या कामात तांत्रिक त्रुटी आढळून आल्या असून त्यामुळेच मिस्त्रींच्या कारचा अपघात झाल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तातडीने रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेत महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना धारेवर धरले होते. त्यानंतर महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बदल पाहायला मिळाले आहेत.

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी रस्ते सुरक्षा समिती सोबतच्या बैठकीनंतर स्वतः महामार्गाची पाहणी करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले असून, त्यांनी चुका दुरुस्त करायला सुरुवात केली आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघात स्थळावरून आधी काही अंतरावर जिथे तीन पदरी रस्ता दोन पदरी होतो त्याठिकाणी दर्शनी भागात सावकाश जा असा सूचना फलक लावण्यात आला आहे. मात्र, हा सूचना फलक लहान असल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर चारोटी उड्डाणपूल सुरू होण्याआधी किलोमीटर दर्शवणारा दगड ठेवण्यात आला होता. त्यावर चारोटी 3 KM असे नमूद होते. मात्र, अपघातानंतर त्या दगडावरील किलोमीटरमध्ये बदल करण्यात आला असून, तिथे आता चारोटी 1 KM असे नमूद करण्यात आले आहे. मुळात किलोमीटर दगड ज्याठिकाणी आहे. तिथून चारोटीचे अंतर 1 किलोमीटरच आहे मग तिथे किलोमीटर का नमूद करण्यात आले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मध्यंतरी जवळजवळ 15 दिवस महामार्गावर उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांवर असणारे विजेचे खांब बंद होते. महामार्ग प्राधिकरणाला ह्याचे कारण विचारले असता, विज देयके थकीत असल्यामुळे विज पुरवठा बंद करण्यात आला होता अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या बैठकीनंतर तत्काळ थकीत भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला मात्र, त्यातही पूर्ण वीजपुरवठा सुरळीत न करता प्रत्येक ठिकाणी एक एक पथदिवे सुरू करून दिलासा देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -