सुरेंद्र सावंत मुख्य अग्निशमन अधिकारी

महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी पदावर नियुक्ती करण्यासंबंधीचे पत्र २३ ऑगस्ट २२ रोजी राज्य सरकारला दिले होते. त्याची दखल घेऊन नगरविकास विभागाने या पदावर सावंत यांची नियुक्ती केली आहे.

वसई : वसई -विरार महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सध्या मुंबई महापालिकेत सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी असलेल्या सुरेंद्र सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वसई -विरार महापालिकेच्या आस्थापनेवर मुख्य अग्निशमन अधिकारी प्रतिनियुक्तीवर दिला जातो. पण, आतापर्यंत हे पद भरले गेले नव्हते. स्थापनेनंतर राज्य सरकारने तेरा वर्षांनी पहिल्यांदाच मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सुरेंद्र सावंत यांची नियुक्ती केली आहे. महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी पदावर नियुक्ती करण्यासंबंधीचे पत्र २३ ऑगस्ट २२ रोजी राज्य सरकारला दिले होते. त्याची दखल घेऊन नगरविकास विभागाने या पदावर सावंत यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, महापालिकेच्या मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून दिलीप पालव यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. पण, पालव नेहमीच वादग्रस्त राहिले होते. पालव कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वसई- विरार महापालिकेत रुजू झाले होते.
पालव या पदासाठी पात्र नसल्याच्याही तक्राही होत्या. कोरोनाकाळात विजय वल्लभ हॉस्पीटल अग्निकांडात पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर फायर ऑडीटचा प्रश्न चव्हाट्यावर आला होता. महापालिका हद्दीतील फायर ऑडीटच होत नसल्याची धक्कादायक माहितीही त्यावेळी उजेडात आली होती.
अग्निशमन विभागातील अनागोंदी कारभार आणि पालव यांच्याबाबतच्या तक्रारीनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी पद प्रतिनियुक्तीवर भरण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर नगरविकास विभागाने यापदावर लायक अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे.