तांदुळवाडी घाटात साईडपट्टी खचली; वाहतुकीला धोका निर्माण

पालघर तालुक्यातील सफाळे-वरई मार्गावरील तांदुळवाडी घाटातील मुख्य रस्त्यालगत असलेली साईडपट्टी गेल्यावर्षीच्या पावसात वाहून गेली होती.

पालघर तालुक्यातील सफाळे-वरई मार्गावरील तांदुळवाडी घाटातील मुख्य रस्त्यालगत असलेली साईडपट्टी गेल्यावर्षीच्या पावसात वाहून गेली होती. यंदाही साईडपट्टी खचल्यामुळे पावसाळ्यात वाहनांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच संबंधित ठेकेदार व अभियंत्याने योग्य प्रकारे काम न केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सफाळे-वरई या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असून शेकडोंच्यावर अवजड वाहनेही या मार्गावरून धावत असतात. पूर्वेकडील पारगाव, नावझे, साखरे गावाजवळील रस्त्यालगत बडोदा एक्सप्रेस वेचे काम युद्धपातळीवर सुरू असून मुरूम मातीची वाहतूक करणारे अवजड वाहने दररोज या मार्गावरून येत-जात असल्याने घाटातील साईडपट्टी जवळील रस्ता खचू शकतो.

सफाळे घाटात गेल्यावर्षी पावसाळ्यात साईडपट्टी वाहून गेली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावेळी योग्य प्रकारे दुरुस्तीचे काम केले नसल्याने याहीवर्षी पावसाळ्यात रस्ता वाहून जाऊन तांदुळवाडी घाटात अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
– वैभव पाटील, सामाजिक कार्यकर्ते

सफाळे घाटात गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात साईडपट्टीवरील सर्व माती वाहून गेल्याने या मार्गावर साईडपट्टीजवळ मोठमोठे खड्डे पडून रस्ता खचला होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंत उभारण्यात येऊन मुरूम मातीने साईडपट्टी भरण्यात आली होती. मात्र आता पुन्हा ही साईडपट्टी खचली असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

तांदुळवाडी घाटातील साईडपट्टीचे काम आठवड्याभरात सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल.
– अरुण चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी

सफाळे घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी रस्त्यावर नव्याने डांबरपट्टा मारला. मात्र साईडपट्टीचे काम करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाला विसर पडला असून अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने खचलेल्या साईडपट्टीचे काम योग्य प्रकारे पूर्ण करून द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा –

नाना पटोलेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीची तक्रार, आता अजितदादा म्हणतात…