घरपालघरधरणातील पाणीसाठा कमी होतोय

धरणातील पाणीसाठा कमी होतोय

Subscribe

महापालिकेकडून शहरात अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. वसई- विरारमधील अनेक भागात चार ते पाच दिवसाच्या आड पाणी पुरवठा केला जात आहे.

विरार:  एकीकडे पाऊस लांबत चालला असून वसई- विरार महापालिका हद्दीत पाणी पुरवठा करणार्‍या धरणातील साठाही दिवसागणिक कमी होत चालला आहे. त्यामुळे वसईकरांवर पाणी टंचाईचे सावट घोंगावू लागले आहे.
वसई- विरारमध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यात अनेक भागात महापालिकेच्या जलवाहिन्या विस्ताराचे काम रखडले आहे. विविध ठिकाणी महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जात नाही. यामुळे नागरिकांना पारंपरिक जलस्त्रोतावर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळाच्या काळात शहरी भागातील अनेक गृहसंकुले, चाळी, वसाहती टँकरच्या पाण्यावर महिन्याला लाखो रुपये खर्च करत आहेत. त्यात महापालिकेच्या धरणातील पाणी साठा आटत असल्याने महापालिकेकडून शहरात अनियमित पाणी पुरवठा सुरु आहे. वसई- विरारमधील अनेक भागात चार ते पाच दिवसाच्या आड पाणी पुरवठा केला जात आहे.

त्यातही ३ तासाच्या ऐवजी केवळ १ ते दीड तास पाणी सोडले जाते. त्यातही पाण्याचा दाब कमी असल्याने आवश्यकतेनुसार पाणी साठवले जात नाही. यामुळे अनेक चाकरमाण्यांना केवळ पाण्यासाठी दांड्या मारून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. टँकरचे पाणी पिण्यालायक नसल्याने पुन्हा पिण्यासाठी वेगळे पाणी विकत घ्यावे लागत आहेत. यामुळे सध्या पाण्यावरील खर्च वाढल्याने नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्रामीण भागात याहून भयानक परिस्थिती निर्माण होत आहे. या भागात असलेले पारंपरिक पाण्याचे स्त्रोत एप्रिल महिन्यातच सुकायला लागले होते. अनेक गावातील विहिरी आटल्या, कूपनलिका बंद झाल्या, तर विंधन विहिरीसुध्दा सुकल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक पाण्यासाठी व्याकुळ आहेत. महापालिकेकडे २३० दशलक्ष पाण्याचा साठा आहे. पण, त्याचे सुद्धा प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे. लवकर पावसाचे आगमन नाही झाले तर संपूर्ण शहराला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -