पत्ते खेळण्याच्या वादातून तीन जण गंभीर जखमी

याबाबत काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

भाईंदर : मीरा -भाईंदर – दहिसर मेट्रो मार्गिका क्र. ९ या ठिकाणी काम करणार्‍या कामगारांचा पत्ते खेळताना झालेल्या अंतर्गत वादात 3 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. प्लेझंट पार्क येथे दोन जण कामगार पत्ते खेळत होते. त्यापैकी एकाने पैसे जिंकल्यानंतर तो निघून जाऊ लागला.तर दुसर्‍याने त्याला अडवले.याचे रूपांतर वादात झाले आणि यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे मोहम्मद आलम, राजा उर्फ मोहम्मद, सद्दाम हुसैन, समीर सिंह, शमीम उर्फ इक्बाल हुलीअल्ला अशी आहेत. तर अजून पाच जण फरार आहेत. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३२४, ३२३, १४८, १४७, १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक टिकाराम थाटकर हे करत आहेत. जे.कुमार ठेकेदाराला काम करण्यासाठी बिहार, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश येथून कामगार आणावे लागतात. ते त्यांच्या काम असलेल्या ठिकाणी लेबर कॅम्प मध्ये राहतात. त्या कामगारांत दोन गट आहेत, त्यात काम किंवा अन्य कारणावरून नेहमीच स्पर्धा असते.