भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानासमोर गावठी हातभट्टी दारु विक्री करण्यासाठी अवैधरित्या वाहतुक करणार्या दोघांना भाईंदर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. आरोपींकडून ४०० लिटर गावठीहातभट्टी दारु व वाहन जप्त करण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा- भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अवैध धंद्यांवर आळा बसण्यासाठी वरिष्ठांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार भाईंदर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकास नियमित पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार के.पी. पवार यांना एका कार मधून गावठी हातभट्टी दारुची मोरवा गावाच्या दिशेने वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्रपाळीस कामावर असलेले सहायक पोलीस निरीक्षक नरोटे व इतर असे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान चौक येथे सापळा रचून थांबले.
त्यावेळी त्यांना मध्यरात्री एक सिल्वर रंगाची कार संशयास्पद रित्या येताना दिसली. त्या कार चालकास थांबण्याचा इशारा केला, तेव्हा कार चालकाने त्यांची कार न थांबवता पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस पथकाने ती कार आडवून कार रस्त्याच्या कडेला घेण्यास सांगितली तेव्हा कार चालकाने कार रस्त्याच्या कडेला थांबवली.त्यानंतर कार चालक मच्छिंद्र लहु मढवी ( ४० ) आणि त्याच्याबरोबर असलेला सुरज सुनिल कोळी (२४ ) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एकूण २ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.