कुवर्‍याच्या वाडीत अज्ञात चोरट्यांची घरफोडी

मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या नाशेरापैकी कुवर्‍याची वाडी येथे १४ मे रोजी मध्यरात्री चांगुणा घाटाळ व सुंदर गुरव या २ आदिवासी महिलांचे घराचे कुड (कारवीची भिंत) फाडून स्त्री धनासह रोकड, असा एकूण लाखाचा ऐवज घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.

मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या नाशेरा पैकी कुवर्‍याची वाडी येथे १४ मे रोजी मध्यरात्री चांगुणा घाटाळ व सुंदर गुरव या २ आदिवासी महिलांचे घराचे कुड (कारवीची भिंत) फाडून स्त्री धनासह रोकड, असा एकूण लाखाचा ऐवज घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबतची तक्रार पोलीस दूरक्षेत्र खोडाळा येथे सकाळी उशिरा दाखल करण्यात आली असून खोडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत. खोडाळा येथून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या नाशेरा पैकी कुवर्‍याची वाडी येथील चांगुणा लक्ष्मण घाटाळ व सुंदर रामू गुरव या आपआपल्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्री साधारण ३ ते ३.३० दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दोन्ही घरे फोडली असून मंगळसूत्र आदी स्त्री धन आणि काही रोकड घेऊन पलायन केले आहे. ही चोरीची घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर येथील चेतन घाटाळ याने खोडाळा पोलीस दूरक्षेत्राला खबर दिली. त्यानंतर या घटनेची नोंद पोलीस दूर क्षेत्रात झाली असून खोडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

यापूर्वी खोडाळा बाजार पेठेतही दिवसाआड चोरीचे सत्र सुरु होते. मात्र त्याचा मोठा गाजावाजा झाल्यावर येथील चोर्‍यांचे सत्र थंडावले होते. मात्र त्यानंतर लगेचच नाशेरा येथून बैलजोडी चोरीला गेली होती. आता दोन घरे फोडून चोरट्यांनी सोन्याचा ऐवज व रोकड घेऊन पोबारा केला आहे. बाजार पेठापाठोपाठ आता अज्ञात चोरांनी दुर्गम भाग केंद्रस्थानी ठेऊन आदिवासी वस्तीकडे मोर्चा वळवला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे.

येथील आदिवासी बांधव हा मान्सून पूर्व वाण सामानाची एक खटी बेगमी करून पावसाळाभर पुरेल इतके धान्य, मिठ, मिरची, तेल साठवून ठेवण्यासाठी ८ महिने कष्ट करून पै-पै साठवत असतो. अशा परिस्थितीत याच पैशांची चोरी झाल्याने आदिवासी बांधवांच्या ८ महिन्याच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. या चोरीच्या घटनांची आणि आदिवासी बांधवाच्या अवस्थेची तातडीने दखल घेऊन चोरीचा छडा लावून रात्र गस्त करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून केली जात आहे.

हेही वाचा – 

राज ठाकरेंची पुढच्या आठवड्यात पुण्यात सभा, उद्या 12 वाजता करणार घोषणा