रायगडमधील ९२ टक्के वीज कर्मचारी संपात सहभागी; २० हजारहून अधिक ग्राहकांना फटका

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरणाला विरोध आणि आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपामुळे दक्षिण रायगड जिल्ह्यातील बत्ती गुल्ल झाल्याने त्याचा फटका तब्बल २० हजारहून अधिक ग्राहकांना बसला.

अलिबाग: महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरणाला विरोध आणि आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी-अधिकारी संघर्ष समितीने तीन दिवसीय संप पुकारला आहे. या संपामुळे दक्षिण रायगड जिल्ह्यातील बत्ती गुल्ल झाल्याने त्याचा फटका तब्बल २० हजारहून अधिक ग्राहकांना बसला.
राज्यातील महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी खासगीकरणाविरोधात ३ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र, या संपाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत बैठक केली. या बैठकीत वीज कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे महावितरणने संप मागे घेतला आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली.
महावितरण कर्मचार्‍यांनी संप पुकारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी चर्चा केली आणि ही चर्चा सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारला कंपन्यांचे खासगीकरण करायचे नाही, याउलट सरकार ३ कंपन्यांमध्ये ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्ह्यातील ८६८ पैकी ८२८ म्हणजे तब्बल ९२ टक्के कर्मचारी हे संपामध्ये सहभागी झाले होते, तर ७० टक्के कंत्राटी कर्मचारी यांनी देखील संपामध्ये उडी घेतली. उरलेल्या कर्मचार्‍यांच्या जीवावरच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वीज पुरवठा सुरळीत करण्यात येत होता.

संपामुळे वीजेचा खोळंबा
वीज अधिकारी, कर्मचारी यांनी ७२ तासांचा संप पुकारल्याने वीजेचा खोळंबा पहायला मिळाला. त्यामध्ये प्रामुख्याने रोहा तालुक्यातील कोलाड, सुतारवाडी येथील वीज गायब झाली होती. माणगाव तालुक्यातील इंदापूरमध्ये तर पहाटे तीन वाजल्या पासूनच वीज गेल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. कंत्राटी कर्मचारी यांना विविध सब स्टेशनमध्ये थांबण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वीज पूर्ववत करण्यात यश येत होते, असे महावितरणेच आय.ए. मुलाणी यांनी सांगितले.

नागरिकांना मात्र चांगलाच मनस्ताप; दैनंदिन कामे ठप्प
महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपन्यातील खासगीकरण धोरणाला विरोध आणि आदानी कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी यांनी या विरोधात ७२ तासांचा संप पुकारल्याने वीज गेल्यावर वीज परत येणार का?, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. जमेची बाजू म्हणजे रायगड जिल्ह्यात विशेष करुन संपाची झळ बसली नाही. मात्र ज्या भागांमध्ये वीज गायब होती. त्या नागरिकांना मात्र चांगलाच मनस्ताप झाला. वीज नसल्याने दैनंदिन कामे थांबली होती. त्यामुळे वीजेशी निगडीत असणारे व्यवसाय, कार्यालये, झेरॉक्स सेंटर, विविध दुकानातील काम ठप्प झाले होते. काहीचे मोबाईल देखील चार्ज करता न आल्याने काही नागरिकांनी जनरेटर सुरु असणार्‍या ठिकाणी जाऊन आपापले मोबाईल चार्ज करुन घेतले. ज्या ठिकाणी वीज गेली होती. शक्य असणार्‍यांनी जनरेटर च्या माध्यमातून वीजेची गरज भागवली परंतू चार तासांपेक्षा अधिक काळ जनरेट सुरु ठेवणे आर्थिकदृष्ट्या खर्चीक ठरत होेते.