कोकणातील समुद्रात केंड माशांचा धुमाकूळ

जाळीने पकडलेली मोठी मासळी केंड मासे फस्त करून सांगाडे शिल्लक ठेवत आहेत असे शेकडो मासळीचे सांगाडे समुद्रात मिळाल्याने मच्छीमार हवालदिल झाले असून मोठे नुकसान झाले आहे.

 

नांदगाव: कोकणातील अरबी समुद्रकिनारपट्टीत धोकादायक केंड माशांचे संकट आले असून समुद्रात दालदी जाळीने पकडलेली मोठी मासळी केंड मासे फस्त करून सांगाडे शिल्लक ठेवत आहेत असे शेकडो मासळीचे सांगाडे समुद्रात मिळाल्याने मच्छीमार हवालदिल झाले असून मोठे नुकसान झाले आहे.परिणामी खोल समुद्रातील मोठी मासेमारी ठप्प होण्याची दाट शक्यता मच्छीमार नाखवा रोहन निशानदार, धनंजय गिदी,रामकृष्ण शेगजी यांनी दिली.
राजपुरी (ता-मुरूड तालुक्यातील येथील रामकृष्ण विष्णू शेगजी यांची ६ सिलेंडर्स असणारी लंकेश्वरी, ही मोठी नौका दालदी जाळी घेऊन खोल समुद्रात मासेमारीस गेली होती.मासेमारी करताना त्यांच्या जाळयात सुरमई,कुपा, रावस, मोर मासे अशा मोठ्या मासळीचे केवळ सांगाडेच सापडल्याने धक्काच बसला.केंड नावाच्या खतरनाक मासळीने जाळी फाडून मोठी मासळी फस्त केल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे सर्वच हादरून गेले.पुन्हा जाळी टाकली तरी मासळी फस्त केली गेली त्यामुळे अखेर मासेमारी थांबवून नौका राजपुरी बंदरात आणली आणि घडलेला प्रसंग सांगितला.
नौकेवरील खलाशी गणेश नागुटकर आणि जयेश शेगजी यांनी हे सांगाडे हातात घेऊन नुकसान आणि मेहनत मातीमोल गेल्याने टाहोच फोडला.आठवडाभर मासेमारी करून शेवटी हेच काय त्याचे फळ असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काही केल्या संकटांची मालिका पाठ सोडत नसल्याने काही मच्छीमारांनी हताश प्रतिक्रिया देखील व्यक्त केली.लाखो रुपयांच्या मासेमारी जाळ्याफाडल्या जात आहेत आणि मासळीचे सांगाडे मिळत असल्याने बहुतांश नौका मालक या प्रकाराने हवालदिल झाले असून मासेमारी थांबवताना दिसून येत आहेत.केंड माशांमुळे मासेमारी सध्या बंद ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर येऊन ठेपली आहे. हा प्रकार न थांबल्यास मुंबई,पुणे,नाशिक,ठाणेसह राज्यात मोठी वानवा निर्माण होऊन उपलब्ध मासळीचे दर देखील गगनाला भिडतील अशी माहिती विविधभागांतून देण्यात आली आहे.काटेरी केंड मासे अरबी समुद्रात कोठून आणि कसे येतात या बाबत निश्चित माहिती नाही; मात्र त्यांची टोळधाड आल्यावर मोठे मासे देखील नेस्तनाबूत होतात अशी माहिती येथे आलेल्या मच्छीमारांनी दिली.

मासळीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता
कोकणात रत्नागिरी दाभोळ रायगड पासून पुढे ठाणे, मुंबई समुद्रकिनारपट्टीत केंड माशांचा सध्या मोठा संचार असून मिळेल ती सर्व मासळी फस्त करीत आहेत. यामध्ये सुरमई, रावस, कुपा, मोर मासे, पापलेट आणि सर्व माशांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबई मार्केट मध्ये मासळी नेऊन विक्री करणार्‍या नौकांची मासेमारी थांबली आहे.१० तास मासेमारीच्या ऐवजी केवळ २ तासच मासेमारी होत असून त्यातही जाळीत मासळी फस्त केलेले सांगाडे आधिक मिळत आहेत. त्यामुळे मासेमारी ठप्प होऊन मुंबई मार्केटमध्ये देखील मासळीचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. अशी माहिती मुरूड, एकदरा, राजपुरी, दिघी येथे परतलेल्या मच्छीमारांनी दिली.

कर्जामुळे मच्छीमार तणावाखाली
केंड मासे आहारात खाल्ले जात नाहीत.इंग्रजीत या माशाला पार्क्युपाईन पफर म्हटले जाते. हे मासे विषारी देखील असतात. पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू झाल्या नंतर वादळी पाऊस, वादळी वारे, अचानक समुद्रात झालेले बदलते वातावरण, जेलिफिशचे आक्रमण, आणि आता केंड माशांचा हल्लाबोळ यामुळे मासेमारी सोडून मच्चीमारांना परतावे लागले.यामुळे खूप नुकसान झाले आहे.जितके पैसे कमावले त्याही पेक्षा गमावून कर्जाचा डोंगर उभा ठाकल्याने मच्छीमार तणावाखाली असल्याचे दिसून आले आहेत.अशातच थंडीचे संकट घोगवत आले आहे.त्या मुळे मासळी खूप खोल समुद्रात जात असून मिळणे अवघड होतं असते. एकूणच संकटाची मालिकाच सुरू आहे.या हल्लाबोळ प्रकारातून बचावलेली थोडीफार मासळी मार्केट मध्ये येत आहे.