घररायगडखोपोलीतील नढाळमध्ये संत निरंकारी मंडळाचे बेकायदेशीर बांधकाम, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

खोपोलीतील नढाळमध्ये संत निरंकारी मंडळाचे बेकायदेशीर बांधकाम, ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा

Subscribe

नढाळ गावाच्या गावठाणाच्या उत्तर बाजूस दोन शासकीय पाझर तलाव आहेत. या पाझर तलावाच्या पाण्याचा वापर ग्रामस्थ उन्हाळी भातशेती व भाजीपाला तसेच गुरांसाठी करत असतात. हे दोन्ही तलाव इरसाल डोंगराच्या पायथ्याशी असून तलावांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होतो. तसेच जुलै-ऑगस्ट महिन्यात अधिक प्रमाणात पाऊस असल्याने दोन्ही तलाव पूर्ण भरून वाहतात.

खोपोली तालुक्यातील नढाळ गावाशेजारी संत निरंकारी मंडळ यांचे चालू असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरीत बंद करण्याच्या मागणीचे निवेदन नढाळ ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे. या कामावर शासनाने नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

खालापूर तालुक्यातील मौजे नढाळ येथील शासकीय पाझर तलावाचे पाणी वाहून जाणार्‍या नाल्याशेजारी संत निरंकारी मंडळ यांनी बेकायदेशीरपणे भिंतीचे बांधकाम केले आहे. यामुळे नाल्याची रुंदी कमी होत असून नाला पावसाळ्यात धोकादायक होऊन जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच येथील वन्य प्राण्यांनाही धोका पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बांधकामावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडे केली आहे. या निवेदनात नमूद केले की, नढाळ गावाच्या गावठाणाच्या उत्तर बाजूस दोन शासकीय पाझर तलाव आहेत. या पाझर तलावाच्या पाण्याचा वापर ग्रामस्थ उन्हाळी भातशेती व भाजीपाला तसेच गुरांसाठी करत असतात. हे दोन्ही तलाव इरसाल डोंगराच्या पायथ्याशी असून तलावांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होतो. तसेच जुलै-ऑगस्ट महिन्यात अधिक प्रमाणात पाऊस असल्याने दोन्ही तलाव पूर्ण भरून वाहतात. या दोन्ही तलावाचे ओढे वेगवेगळे असून नढाळ आदिवासी वाडी शेजारील असलेल्या रेल्वे पुलाखाली दोन्ही ओढे एकत्र येऊन ओसंडून वाहतात.

- Advertisement -

येथील ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने येथील काही व्यक्तींनी आपल्या काही मिळकती या मुंबई व इतर धनिकांना विक्री केलेल्या आहेत. त्यांनी ग्रामस्थांच्या व शासनाच्या न कळत दोन्ही ओढ्या शेजारी बेकायदेशीर पध्दतीने पक्क्या स्वरूपाचे बेकायदेशीर बांधकाम केले आहे. या गावाच्या शेजारून मुंबई-पुणे महामार्ग क्र.४ गेला असून या रस्त्याच्या शेजारील जमिनी संपादित झाल्या आहेत. तर बाजूनेच पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग गेल्याने या बाजूला पूल बांधण्यात आले आहेत. पूल असल्याने येथील तळ्यातील येणारे पाणी हे नाल्यात मोठ्या प्रमाणात साठत असून अजून त्या शेजारी जर अतिक्रमण झाले तर भात शेती सोबत नैसर्गिक व जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील काही धनिकांनी तलावाशेजारील जमिनी घेऊन तलावाचे क्षेत्र स्वतःच्या ताब्यात घेऊन तेथे बंगलो, फार्म हाऊस यांचे आरसीसी स्वरूपाचे बांधकाम केले आहे.

या बेकायदेशीर कामाची माहिती शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महसूल विभागाने व तहसीलदार यांनी सदर धनिकांस ८७ लाख ९७ हजार ८०० रुपये दंड आकारला. मात्र सदर इसमाने दंड न भरल्याने त्याच्या सात बारा उतारावर याची नोंद करण्यात आली व तसा फेरफारही करण्यात आला. मात्र, येथे चालू असलेल्या संत निरंकारी मंडळ यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर पध्दतीने काम सुरू केल्याने त्यांच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी २७ जानेवारी रोजी तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने मंगळवारी ग्रामस्थांनी आपले शिष्टमंडळ घेऊन तहसीलदार कार्यालय गाठत तहसीलदार यांना साकडे घातले.

- Advertisement -

ग्रामस्थांनी थेट बांधकाम विभाग व जिल्हा परिषद यांच्याशी पत्र व्यवहार करून माहिती घेतली असता सदर मंडळाने कोणत्याही प्रकारची परवानगी न घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हे बेकायदेशीर बांधकाम थांबवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून दंड आकारणी करावी. जर कोणतीही कारवाई झाली नाही तर उपोषण व आंदोलन करू.
– मधुकर दळवी, सामाजिक कार्यकर्ते, नढाळ

याप्रकरणी चौकशी करून दोन्ही बाजूची बैठक घेऊ. त्यावर मार्ग काढून ग्रामस्थांना न्याय देऊ. जर दोषी असल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
– आयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -