घररायगडन्याय्य हक्कांसाठी आदिवासींचे अलिबागमध्ये बेमुदत उपोषण

न्याय्य हक्कांसाठी आदिवासींचे अलिबागमध्ये बेमुदत उपोषण

Subscribe

माणुसकीची भीक नको हक्क हवा, हक्क हवा; आदिवासी ढोर नाय, माणूस हाय माणूस हाय; या स्वातंत्र्याच झालं काय आमच्या पर्यंत पोहचलच नाय... अशा घोषणांनी मंगळवारी अलिबागनगरी दुमदुमून निघाली. पेण तालुक्यातील तब्बल १५ आदिवासी वाड्यांमधील शेकडो ग्रामस्थ शासनाच्या नावाने शिमगा करीत आपल्या संविधानिक हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचले होते. आदिवासी बांधवांचा रस्ता, शिक्षण, पाणी आणि मतदानाचा हक्क अधिकारी आणि शासनाने चोरला असल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांनी धिक्कार केला.

अलिबाग: माणुसकीची भीक नको हक्क हवा, हक्क हवा; आदिवासी ढोर नाय, माणूस हाय माणूस हाय; या स्वातंत्र्याच झालं काय आमच्या पर्यंत पोहचलच नाय… अशा घोषणांनी मंगळवारी अलिबागनगरी दुमदुमून निघाली. पेण तालुक्यातील तब्बल १५ आदिवासी वाड्यांमधील शेकडो ग्रामस्थ शासनाच्या नावाने शिमगा करीत आपल्या संविधानिक हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहचले होते. आदिवासी बांधवांचा रस्ता, शिक्षण, पाणी आणि मतदानाचा हक्क अधिकारी आणि शासनाने चोरला असल्याचा आरोप करीत आदिवासी बांधवांनी धिक्कार केला. आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संतोष ठाकूर, मानसी पाटील, अ‍ॅड.सिद्धार्थ इंगळे, नर्मदा वाघे, नीलम वाघ, सुनील वाघमारे, काळ्या कडू, गुरुदास वाघे, संतोष घाटे, ज्ञानेश्वर माडे यांनी बेमुदत उपोषणाचे अस्त्र उपसले आहे .
पेण तालुक्यातील वडमालवाडी, तांबडी, उंबरमाळ, केळीचीवाडी, काजूचीवाडी, खऊसावाडी,खालापूर तालुक्यातील करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा, पनवेल तालुक्यातील कोरल वाडी आणि टोकाची वाडी या आदिवासी वाड्यांवर आजही मूलभूत गरजा पोहचविण्यात शासन अपयशी ठरले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीचीवाडी आणि उंबरमाळ ह्या पाच आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांनी ७५ वर्षात एकदाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही. आपल्याच देशातील जंगलाच्या राजाला परकीय तथा सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप संतोष ठाकूर यांनी केला.

संबंधित यंत्रणांखडून केवळ आश्वासने
एका बाजूला जिल्हाधिकारी कातकरी उत्थान कार्यक्रमाचे गाजावाजा करत असताना याच जिल्ह्यात आजही अशा अनेक आदिवासी वाड्या आहेत जिथे चालायला साधा रस्ता, पिण्यासाठी शुद्ध पाणी, यासारख्या मूलभूत सुविधाही दिल्या जात नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. वारंवार प्रत्यक्ष भेटून,पत्रव्यवहार करून मोर्चे, आंदोलने करूनही समस्या सुटत नाहीत. तसेच विद्यमान पालकमंत्र्यांनी बोलावलेल्या जनता दरबारातही आदिवासींच्या समस्या प्रशासकीय यंत्रणेच्या लक्षात आणून देखील संबंधित यंत्रणेने आश्वासनांपलीकडे कोणतीच कारवाई करण्यास अनुकूलता दर्शविली नसल्याने आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

- Advertisement -

अशा आहेत मागण्या
सर्व आदिवासी वाड्यांवर जल जीवन मिशनबाबत बैठका घेऊन योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, ग्रुप ग्रामपंचायत दूश्मी-खारपाडाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करून वडमालवाडी आदिवासी वाडीला जल जीवन मिशन मधून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यात यावी, तांबडी, काजूची वाडी, खऊसावाडी, केळीचीवाडी आणि उंबरमाळ या पाचही वाड्यांच्या रस्त्यांचे काम तात्काळ करण्यात यावी; जलजीवन मिशन मधून वाडीनिहाय लोक सहभागीय पद्धतीने स्वतंत्र आराखडे तयार करून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात यावी; पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि टोकाचीवाडी येथील रस्त्यांचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे; खालापूर तालुक्यातील खरीवली ग्रामपंचायत हद्दतील करंबेळी ठाकूरवाडी आणि खडई धनगरवाडा येथील रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -