घररायगडमाथेरान नगरपालिका : शिवसेना नगरसेवकांच्या सोडचिठ्ठीमागे एमएमआरडीएचे ‘घबाड’ कारणीभूत?

माथेरान नगरपालिका : शिवसेना नगरसेवकांच्या सोडचिठ्ठीमागे एमएमआरडीएचे ‘घबाड’ कारणीभूत?

Subscribe

एकही नगरसेवक नसताना भारतीय जनता पक्षाच्या हाती शहरात आयतेच १० नगरसेवक लागले असून, माथेरानच्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या निधीवरील डोळा हे यामागचे कारण असल्याची चर्चा माथेरानमध्ये सुरू झाली आहे. माथेरानच्या विकासासासाठी एमएमआरडीएच्या विद्यमाने सरकारने मोठा निधी दिला आहे. निधीवर डोळा असलेले नगरसेवक सत्तेशी फटकून वागत होते. याची परिणती अखेर फुटीत झाल्याचे बोलले जाते. हे नगरसेवक अचानक भाजपला जाऊन मिळाल्याने शिवसेनेच्या गोटात सन्नाटा असून, शिवसेनेला केलेला अखेरचा जय महाराष्ट्र कट्टर शिवसैनिकांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे भविष्यात नगर परिषद आणि इतरत्र या दोन पक्षांत टोकाचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. तर दुसरीकडे शहरात एमएमआरडीएच्या सुरू असलेल्या कामांवर नजर ठेवत या १० नगरसेवकांनी पक्षांतर केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शत-प्रतिशत शिवसेना असे नगर परिषदेतील वातावरण असले तरी गेल्या दोन वर्षांपासून जुने-नवे असा सुप्त संघर्ष सुरू होता. काहीवेळा तर हा संघर्ष हाणामारीपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले. मात्र पक्षश्रेष्ठी किंवा इतर नेत्यांनी हा वाद मिटविण्याऐवजी त्याला हस्ते-परहस्ते खतपाणी घातल्याचे अनेक शिवसैनिक खासगीत सांगतात. नगराध्यक्ष प्रेरणा सावंत आणि त्यांचे पती प्रसाद सावंत हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय नेते. मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘सबकुछ सावंत’ असे वातावरण तयार झाल्याने याची सल अनेक जुन्या शिवसैनिकांना लागून होती. यातच माथेरानच्या विकासासाठी एमएमआरडीएकडून विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोठा निधी दिला. इतका मोठा निधी मिळूनही यातून काहीच वाटा हाती लागत नसल्याची सल नगरसेवकांमध्ये होती. यावरूनही अनेकदा वाद निर्माण झाला होता. याचीच परिणीती १० नगरसेवक भाजपवासी होण्यात झाल्याचे सांगतात.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या पालिकेतील सत्तेतील भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भाजपचे नेते असे ऑपरेशन करण्यासाठी प्रयत्नाला लागले होते. यात माथेरानचा हा वाद भाजप नेत्यांच्या आयता हाती लागला. यातून १० नगरसेवक भाजपवासी होण्यात झाल्याचे सांगितले जाते.

भाजपचे फोडाफोडाचे तंत्र माहित असतानाही शिवसेनेचे स्थानिक नेते, ज्येष्ठ कार्यकर्ते गाफील राहिले. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या स्थानिक नेतृत्त्वालाही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक आपल्या पक्षात येणार असल्याची पुसटशीही कल्पना नव्हती. फोडाफोडीचे हे षडयंत्र अतिशय पद्धतशीरपणे वरिष्ठ पातळीवरून रचण्यात आल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात लवकरच सत्तापालट होऊन एमएमआरडीएची कामे आपल्या हाती येतील असे गाजर फुटीर नगरसेवकांना दाखविल्याचा आरोप आता शिवसैनिक करीत आहेत. 123 कोटींहून अधिक रकमेची कामे सध्या शहर आणि परिसरात सुरू आहेत.

- Advertisement -

या संदर्भात शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी फुटीरांनी हे पाऊल उचलताना आपल्याशी साधी चर्चाही केली नाही, असे म्हटले. श्रेष्ठींच्या आदेशानंतर फुटीरांवर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. १० जणांच्या भाजप प्रवेशानंतर नगराध्यक्ष, गटनेते आणि त्यांचे समर्थक नगरसेवक अज्ञातस्थळी असून, यापैकी एकाचाही मोबाईलवरून संपर्क झाला नाही. तर भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर हेही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.

माथेरान शहराचा समावेश कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ आणि पुणे-रायगडमधील मावळ लोकसभा मतदारसंघात आहे. स्थानिक आमदार, तसेच खासदारही शिवसेनचे असून, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माथेरानवर विशेष प्रेम असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विकास कामांसाठी घसघशीत निधी उपलब्ध करून दिला. हाच विकास निधी शिवसेनेच्या मुळावर आल्याची चर्चा पक्षात आहे. स्वाभाविक काही महिन्यांवर होऊ घातलेली नगर परिषदेची निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरणार किंवा कसे हे काळच ठरवेल.

शिवसेनेतील बंडखोरीला एमएमआरडीएचा करोडो रुपयांचा निधी कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता नाहीच मिळाली तर केंद्रातून पाहिजे तेवढा निधी विकास कामांसाठी आणून देऊ, असे आश्वासन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या बंडखोर नगरसेवकांना दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विकासाच्या पडद्याआडून उफाळून आलेली बंडखोरी भविष्यात शहराचा विकास घडवून आणण्यासाठी फायदेशीर ठरणार, की वैयक्तिक विकासात चिंब होणार, हे लवकरच दिसून येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -