घररायगडदाणा-पाण्यासाठी पक्ष्यांची वणवण

दाणा-पाण्यासाठी पक्ष्यांची वणवण

Subscribe

भूक आणि पाण्यावाचून, तसेच यातून येणार्‍या तणावामुळे पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने मानव, पशू यांच्यासह पक्षीही अस्वस्थ होऊ लागले असून, दाणा आणि पाणी मिळविण्यासाठी पक्ष्यांची केविलवाणी वणवण सुरू आहे. नेहमीपेक्षा यावर्षी उन्हाचे चटके लवकर बसू लागले आहेत. दररोज दिवसाच्या तापमानात वाढ होत असल्याने पक्ष्यांचा एरव्ही ऐकायला मिळणारा किलबिलाटही मंदावला आहे. जंगलात स्वैरपणे फिरणारे पक्षी दाणा-पाण्यासाठी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. भूक आणि पाण्यावाचून, तसेच यातून येणार्‍या तणावामुळे पक्ष्यांचे मृत्यू होण्याची शक्यता पक्षी अभ्यासक आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

माणगाव तालुक्यातील विळे-पाटणूस भागात नुकत्याच अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. रविवारी पाण्यासाठी वणवण फिरताना पिवळ्या डोळ्याचा सातभाई नावाचा पक्षी भर दुपारी अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी झालेला पक्षी अभ्यासक राम मुंढे यांना आढळला. त्यानंतर हा पक्षी दगावला. त्याच दिवशी भिरा येथील संकेत देवरुखकर यांच्या घराच्या अंगणात घारीचे एक मोठे पिल्लू निपचित पडले होते. त्यांनी मुंढे यांना याबाबत माहिती देऊन बोलावून घेतले. सध्या उन्हाची तीव्रता जास्त वाढत असल्यामुळे या पिल्लाच्या शरीरातील पाणी कमी झाले आणि त्रास होऊ लागल्यामुळे ते अंगणात येऊन बसल्याचे मुंढे यांनी सांगितले. पाणी पिऊन तासाभराने तेथून निघून गेले. या संदर्भात मुंढे यांनी वन विभागाशी देखील संपर्क केला. आपल्या भागात अशा घटना घडत असतील तर वन विभाग या संदर्भात सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन वनरक्षक अमोल निकम यांनी दिले.

- Advertisement -

सध्या घारीची पिल्ले घरट्यातून बाहेर पडतात. ऐन उन्हाळ्यात बाहेर पडल्यामुळे ती विचलित होतात. उन्हाचा त्रास आणि पाणी न मिळाल्याने हे पक्षी अस्वस्थ होतात. इतर पक्षांच्या बाबतीतही असे घडते.
-राम मुंढे, पक्षी अभ्यासक

ऊन वाढू लागल्याने पशु-पक्ष्याची अन्न, पाण्यासाठी भटकंती वाढते. तसेच सावलीची देखील आवश्यकता लागते. हे मिळविण्याच्या खटाटोपात पक्षी तणावात (स्ट्रेस) जातात आणि त्यांचा मृत्यू ओढवतो. नागरिकांनी आपल्या घराच्या छपरावर, अंगणात किंवा झाडावर थोड्या पाण्याची आणि दाण्याची व्यवस्था केली तरी या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो. तसेच जंगलातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाण्याचे स्रोत, पाणवठ्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.
-डॉ. प्रशांत कोकरे, पशुधन विकास अधिकारी, सुधागड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -