घररायगडश्रीवर्धन आगाराचा कारभार फेल?

श्रीवर्धन आगाराचा कारभार फेल?

Subscribe

गाड्यांचे ब्रेक फेल होण्याच्या घटनांत वाढ

 

 

- Advertisement -

सोपान निंबरे: कोलमांडले
येन् केन् प्रकारे चर्चेत राहणार्‍या एसटीच्या श्रीवर्धन आगाराचा एकूण कारभारच ‘फेल’ झालायं की काय, अशी चर्चा सध्या प्रवाशांत आहे. अवघ्या महिनाभराच्या अवधीत गाड्यांचे ब्रेक फेल (निकामी) होण्याचे दहा प्रकार घडल्याचे बोलले जात असून, प्रवाशांत भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे आगाराकडून याबाबत योग्य माहिती मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नेत्यांकडून होत आहे.
मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या या आगाराचे श्रीवर्धनप्रमाणेच शेजारच्या म्हसळे तालुक्यातील जनतेने मनापासून स्वागत केले होते. श्रीवर्धन तालुका दुर्गम भागात वसलेला असल्याने यापूर्वी एसटीच्या पुरेश्या सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत असत. मात्र आगार सुरू होताच प्रवाशांना मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक आदी ठिकाणी जा-ये करणे सोपे झाले. कालौघात या आगाराचा कारभार ढेपाळत गेल्याने प्रवाशांत तीव्र नाराजीची भावना आहे. अशातच गेल्या महिनाभरात गाड्यांचे ब्रेक फेल होण्याच्या दहा घटना घडल्याची चर्चा असून, आगारात येणार्‍या गाड्यांची वेळेत देखभाल-दुरुस्ती होते की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. गाड्यांना पुरेशी विश्रांती न देताच त्या वेगवेगळ्या मार्गावर दामटविण्यात येत असल्याचा आरोप होत असून, कर्मचारीही खासगीत याला दुजोरा देत आहेत.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ
काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन ते तुरंबाडी गाडीचे जांभूळ हद्दीत ब्रेक फेल होण्याची घटना घडली. तर श्रीवर्धन ते पुणे गाडीचे मुळशी हद्दीत ब्रेक फेल झाले. श्रीवर्धन ते कारिवणे या गाडीचे कोलमांडला हद्दीत ब्रेक फेल झाले. श्रीवर्धन ते दिघी मार्गे हरवीत गाडीचा कुडगाव हद्दीत ब्रेक फेल झाल्याचे समोर आले आहे. ब्रेक फेल होण्याच्या इतक्या गंभीर घटना घडूनही आगाराच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योग्य देखभाल, दुरुस्तीशिवाय गाड्यांच्या फेर्‍या चालविणे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सोडण्यात येणार्‍या गाड्यांची धडपणे स्वच्छताही केली जात नसल्याने प्रवाशांचे कपडे धुळीने माखत असल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक फेल झालेल्या गाड्यांच्या चालकांनी सतर्कता दाखविल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी दुर्दैवाने भविष्यात काही अघटित घडलेच तर याची जबाबदारी आगार प्रमुख किंवा त्यांचे वरिष्ठ घेणार का, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

मोबाईल बंद

तालुक्याचा बहुतांश भाग डोंगराळ आणि दुर्गम असल्याने गाडीचे ब्रेक सुस्थितीतच पाहिजेत हे या अधिकार्‍यांना समजत नाही का, असाही सवाल विचारला जात आहे. प्रवाशांच्या या संतापाची दखल घेत काही स्थानिक नेत्यांनी आगार प्रमुखांशी संपर्क केला असता त्यांना योग्य माहिती मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. दैनिक ‘आपलं महानगर’ने बुधवारी दुपारी ४ वाजल्यानंतर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आगार प्रमुख गायकवाड यांच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो बंद होता.

कामचलाऊ दुरुस्ती
श्रीवर्धन आगारातून दूरदूरच्या ठिकाणी फेर्‍या चालविल्या जातात. त्यामुळे आगारात उपलब्ध असलेल्या गाड्यांद्वारे स्थानिक फेर्‍या चालविण्यात येतात. बहुतांशी गाड्या ‘टुकार’ या व्याख्येत चपखल बसणार्‍या असतात. त्यामुळे प्रवासाचे पैसे मोजणारा प्रवासी कसाबसा प्रवास पूर्ण करतो. गाड्यांच्या पळापळीत देखभाल-दुरुस्तीकडे योग्य प्रकारे लक्ष दिले जात नाही, तर अनेकदा त्याकरिता लागणारे साहित्यही वेळेत उपलब्ध झालेले नसते. परिणामी कामचलाऊ दुरुस्ती करून गाड्या सोडल्या जातात. गाड्यांना पुरेशी विश्रांती मिळत नसताना त्यांची देखभाल-दुरुस्तीही धडपणे होत नसल्याने चालक गाडी हाती घेण्यापूर्वी कुरकूर करतात, अशी माहिती आहे. रायगड जिल्ह्याच्या आडमार्गाला असलेले हे आगार केव्हा सक्षम होणार, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे दूर मार्गावरील फेर्‍या मनमानीपणे चालविल्या जात असल्याचा आरोप होत असून, पुणे, अलिबाग मार्गावर फेर्‍या वाढविण्याची मागणी होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -