घररायगडभर समुद्रात जेएनपीटीची जहाजे रोखली

भर समुद्रात जेएनपीटीची जहाजे रोखली

Subscribe

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची धरपकड

तब्बल 32 वर्षापासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या तालुक्यातील वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाड्याचे नव्याने पुनर्वसन न केल्याने शुक्रवारी भर समुद्रामध्ये जेएनपीटीला येणारी जहाजे रोखण्यासाठी धाडसी आंदोलनाचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थांसह कोळी बांधवानी आपल्या पारंपारिक होड्या जहाजांच्या मार्गात आडव्या आणून मार्ग रोखून धरला होता. त्यामुळे जेएनपीटी प्रशासन आणि पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती. पोलिसांनी काही ग्रामस्थांना समुद्र किनार्‍यावरच रोखून ताब्यात घेतले होते तरी देखील शेकडो महिला आणि तरुणांनी समुद्रात मार्ग रोखून धरला होता.

जेएनपीटी प्रकल्प वसविण्यासाठी हनुमान कोळीवाडा गाव उठविण्यात आले होते. मात्र या गावाचे शासकीय मानकांनुसार पुनर्वसन करण्यात आले नाही. 17.5 हेक्टर जागेवर पुनर्वसन करणे गरजेचे असताना फक्त साडेचार एकर जमिनीवर आणि ते सुद्धा वाळवीच्या जागेवर पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण गावा वाळवीने पोखरले आहे.

- Advertisement -

त्यामुळे शासनाच्या नियमानुसार 17 हेक्टर सोयीसुविधा असलेल्या जागेवर गावाचे पुन्हा पुनर्वसन करावे, अशी मागणी सातत्याने ग्रामस्थ करीत आहेत. यासाठी केंद्र सरकारपासून राज्य सरकारचे उंबरठे झिजवले गेले, मात्र न्याय मिळाला नाही. आता या ग्रामस्थांनी आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला असून, जेएनपीटी बंदराकडे येणारी जहाजे अडवून कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळपासूनच आक्रमक झालेले ग्रामस्थ जहाजे अडविण्यासाठी निघाले असताना वाटेतच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिसांच्या या प्रशासनधार्जिण्या भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत असून, जेएनपीटी प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, गनिमी काव्याने समुद्रात पोहचलेल्या काही ग्रामस्थांनी समुद्रात आपल्या होड्या आडव्या टाकून जहाज रोको करण्याचा प्रयत्न केला. यात महिलाही सहभागी होत्या. पोलिसांनी जवळपास चारशे ते पाचशे ग्रामस्थांना ताब्यात घेऊन जेएनपीटी टाऊनशिपच्या क्लब हाऊसमध्ये डांबून ठेवले. या अभूतपूर्व आंदोलनाचीच दिवसभर तालुक्यात चर्चा होती. त्यामुळे प्रशासन ग्रामस्थांना न्याय देणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -