घरक्रीडाबुंडसलिगा इज बॅक!

बुंडसलिगा इज बॅक!

Subscribe

जर्मनीतील फुटबॉल स्पर्धा दोन महिन्यांनंतर सुरु

करोनाच्या पार्श्वभूमीवर युरोपमधील सर्व फुटबॉल स्पर्धा मार्चच्या मध्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, जर्मनीत करोना धोका कमी झाल्यानंतर तेथील फुटबॉल स्पर्धा बुंडसलिगाला सरकारने हिरवा कंदील दाखवला. जवळपास दोन महिन्यांनंतर युरोपमधील फुटबॉल पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता होती. ते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर शनिवारी तो क्षण आला. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून, तसेच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बुंडसलिगा स्पर्धेला सुरुवात झाली.

बुरुसिया डॉर्टमंड आणि शाल्का हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ. या दोन संघांमधील सामने नेहमीच चुरशीचे होतात. डॉर्टमंड संघाचे घरचे मैदान असणार्‍या सिग्नल इडूना पार्कची आसनसंख्या ८१ हजारहून अधिक आहे. एरवी या स्टेडियममधील एकही सीट रिकामी नसते. मात्र, सुरक्षिततेचा विचार करुन शनिवारी झालेला हा सामना प्रेक्षकांविनाच पार पडला. एर्लिंग हालेंड, राफाएल गरेरो (२) आणि थोर्गन हझार्डच्या गोलच्या जोरावर डॉर्टमंडने हा सामना ४-० असा जिंकला. या सामन्यात सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करुन राखीव खेळाडू एकमेकांत ठराविक अंतर ठेवून बसले होते. त्यांनी मास्कही लावले. तसेच चेंडूला सॅनिटायझर लावण्यात आले.

- Advertisement -

हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये होत असल्याने घरी बसून सामना पाहणार्‍या चाहत्यांना खेळाडू, प्रशिक्षक यांचे आवाज, त्यांनी केलेल्या सूचना स्पष्टपणे ऐकू येतात. त्यामुळे खेळाडूंना अपशब्द वापरु नका, अशी ताकीद देण्यात आली आहे. तसेच इतर खेळाडूंशी हस्तांदोलन किंवा त्यांना मिठ्या मारण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. बुंडसलिगाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास युरोपमधील इतर महासंघही आपल्या स्पर्धा पुन्हा करण्याबाबत विचार करतील.

शनिवारी झालेल्या सामन्यांचे निकाल : बुरुसिया डॉर्टमंड ४-० शाल्का, हॉफेनहैम ०-३ हेर्था बर्लिन, ऑग्सबर्ग १-२ वोल्फ्सबर्ग, डुसेलडॉर्फ ०-० पाडेरबोर्न, लॅपझिंग १-१ फ्रायबर्ग, फ्रँकफर्ट १-३ बुरुसिया मोंचेनग्लाडबाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -