घरक्रीडाबटलरची कमाल, इंग्लंडची धमाल

बटलरची कमाल, इंग्लंडची धमाल

Subscribe

जॉस बटलर, कर्णधार इऑन मॉर्गनची अप्रतिम फलंदाजी आणि आदिल रशीदच्या ५ विकेटच्या जोरावर इंग्लंडने वेस्ट इंडिजचा चौथ्या एकदिवसीय सामन्यात २९ धावांनी पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या ४१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला ३ षटकांत ३० धावांची गरज असताना लेगस्पिनर रशीदने ५ चेंडूंत ४ विकेट घेत इंग्लंडला विजय मिळवून दिला. या विजयामुळे इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स आणि जॉनी बेरस्टोव यांनी डावाची दमदार सुरुवात केली. सामन्याच्या ७ व्या षटकात बेरस्टोवने ३१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आणि हेल्सने मिळून पहिल्या १० षटकांतच ८९ धावा करत इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मात्र, ओशेन थॉमसने बेरस्टोवला ५६ धावांवर बाद केले. त्याने या धावा ४३ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने केल्या. त्यानंतर जो रूट फारकाळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. थॉमसनेच त्याला ५ धावांवर बाद केले. हेल्सने मात्र चांगली फलंदाजी सुरू ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले, पण ८२ धावांवर अ‍ॅश्ली नर्सने हेल्सला माघारी पाठवले. शिमरॉन हेटमायरने त्याचा अप्रतिम झेल पकडला. यानंतर कर्णधार इऑन मॉर्गन आणि जॉस बटलर उत्कृष्ट फलंदाजी केली.

- Advertisement -

या दोघांनीही विंडीजच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत जवळपास २१ षटकांत २०४ धावांची भागीदारी केली. या दोघांनी भागीदारीतील १०० ते १५० या ५० धावांचा टप्पा अवघ्या १५ चेंडूंत पूर्ण केला. बटलरने ६० चेंडूंत आपले शतक पूर्ण केले, तर मॉर्गनने ८६ चेंडूंत १०० धावा पूर्ण केल्या. मॉर्गन १०३ धावांवर बाद झाल्यानंतर बटलरने इंग्लंडच्या डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. बटलरने या डावाच्या अखेरच्या षटकात १५० धावाही पूर्ण केल्या. मात्र, याच धावसंख्येवर तो बाद झाला. बटलरने १५० धावा ७७ चेंडूंत १३ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने केल्या. त्याच्या या खेळीमुळेच इंग्लंडने ५० षटकांत ६ विकेट गमावत ४१८ धावांचा डोंगर उभारला.

४१९ धावांचा पाठलाग करताना विंडीजला चांगल्या सुरुवातीची गरज होती, पण विंडीजने ४४ धावांतच २ विकेट गमावल्या. यानंतर मात्र क्रिस गेल आणि डॅरेन ब्रावो यांनी आक्रमक फलंदाजी केली. गेलने अवघ्या ३२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे आक्रमण त्याने पुढेही सुरू ठेवत अवघ्या ५५ चेंडूंत आपले शतक झळकावले. दरम्यान, ब्रावोनेही ५४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ६१ धावांवर असताना मार्क वूडला मोठा फटका मारण्याच्या नादात तो माघारी परतला. त्याने आणि गेलने तिसर्‍या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली. यानंतर हेटमायरने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला, पण पुढच्याच चेंडूवर पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. पुढे गेल आणि कर्णधार जेसन होल्डरने काहीकाळ चांगली फलंदाजी केली. गेलने अवघ्या ८५ चेंडूंत १५० धावाही पूर्ण केल्या.

- Advertisement -

अखेर १६२ धावांवर त्याला बेन स्टोक्सने यष्टिचित केले. त्याने या धावा ९७ चेंडूंत ११ चौकार आणि १४ षटकारांच्या मदतीने केल्या. यानंतर होल्डर (२९), कार्लोस ब्रेथवेट (५०) आणि अ‍ॅश्ली नर्स (४३) यांनी विंडीजला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. विंडीजचा डाव ३८९ धावांत आटोपला आणि त्यांचा २९ धावांनी पराभव झाला. १५० धावा करणार्‍या बटलरला सामनाविराचा पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड : ५० षटकांत ६ बाद ४१८ (जॉस बटलर १५०, इऑन मॉर्गन १०३, अ‍ॅलेक्स हेल्स ८२; कार्लोस ब्रेथवेट २/६९, ओशेन थॉमस २/८४) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४८ षटकांत सर्व बाद ३८९ (क्रिस गेल १६२, डॅरेन ब्रावो ६१, कार्लोस ब्रेथवेट ५०; आदिल रशीद ५/८५; मार्क वूड ४/६०).

या सामन्यात झालेले अनोखे विक्रम

– या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४६ षटकार मारलेे. हा एकदिवसीय क्रिकेटमधील नवा विक्रम झाला आहे. याआधी एका सामन्यात सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा ३८ चा होता. हा विक्रम २०१३ मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यात झाला होता.

– या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या रूपात एकूण विक्रमी ५३२ धावा आल्या. याआधी चौकार आणि षटकारांच्या रूपात सर्वाधिक ५०४ धावा २००६ मध्ये द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात आल्या होत्या.

– इंग्लंडने एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावे केला. त्यांनी या सामन्यात २४ षटकार लगावले. काही दिवसांआधीच विंडीजने २३ षटकार लगावत विक्रम केला होता.

– क्रिस गेलने या सामन्यादरम्यान १०,००० एकदिवसीय धावांचा आणि ५०० आंतरराष्ट्रीय षटकारांचा टप्पाही पार केला. १०,००० धावांचा टप्पा पार करणारा ब्रायन लारा नंतरचा तो केवळ दुसरा वेस्ट इंडियन फलंदाज आहे.

– जॉस बटलरने या सामन्यात १२ षटकार लगावले. एका एकदिवसीय सामन्यात १० षटकारांचा टप्पा पार करणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे.

– इंग्लंडने फलंदाजी करताना ४१८ धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडिजमधील ही एखाद्या संघाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

– विंडीजने या सामन्यात ३८९ धावा केल्या. ही विंडीजची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

– इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनने या सामन्यादरम्यान एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा तो इंग्लंडचा पहिला फलंदाज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -