चुरशीच्या सामन्यात लिव्हरपूलची आर्सनलवर मात

कारबाओ कप फुटबॉल

लिव्हरपूलने चुरशीच्या झालेल्या सामन्यात आर्सनलवर मात करत इंग्लंडमधील फुटबॉल स्पर्धा कारबाओ कपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात ९० मिनिटांच्या नियमित सामन्यात दोन्ही संघांमध्ये ५-५ अशी बरोबरी होती. त्यामुळे सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूट-आऊट खेळवण्यात आली. यात लिव्हरपूलने ५-४ अशी बाजी मारली आणि या स्पर्धेत आगेकूच केली. आर्सनलचे प्रशिक्षक उनाई एम्री आणि लिव्हरपूलचे प्रशिक्षक जुर्गन क्लॉप यांनी संघात प्रत्येकी ११ बदल केले होते.

या सामन्याची लिव्हरपूलने दमदार सुरुवात केली. श्कोद्रान मुस्ताफिने केलेल्या स्वयंगोलमुळे लिव्हरपूलला १-० अशी आघाडी मिळाली. मात्र, त्यांना ही आघाडी फारकाळ टिकवता आली नाही. या सामन्याच्या १९ व्या मिनिटाला लुकास टोरेराने गोल केला आणि आर्सनलला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर युवा स्ट्रायकर गॅब्रिएल मार्टिनेलीने २६ आणि ३६ व्या मिनिटाला दोन गोल करत आर्सनलला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला लिव्हरपूलला पेनल्टी मिळाली. यावर जेम्स मिल्नरने गोल करून आर्सनलची आघाडी ३-२ अशी कमी केली.

मध्यंतरानंतरही दोन्ही संघांनी आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. याचा फायदा आधी आर्सनलला मिळाला. ५४ व्या मिनिटाला एन्सले मेटलँड-नाईल्सने केलेल्या गोलमुळे आर्सनलला ४-२ अशी आघाडी मिळाली. मात्र, ५८ व्या मिनिटाला अ‍ॅलेक्स ऑक्सलेड-चेम्बरलीनने, तर ६२ व्या मिनिटाला डिवॉक ओरिगीने गोल करत आर्सनलला ४-४ अशी बरोबरी करून दिली. परंतु, आर्सनलने पुन्हा दमदार पुनरागमन केले. ७० व्या मिनिटाला मॅटीओ गुंडोझीच्या पासवर युवा खेळाडू जो विलकने गोल केला आणि आर्सनलला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. आर्सनल हा सामना ५-४ असा जिंकणार असे वाटत असतानाच ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत ओरिगीने आपला दुसरा आणि लिव्हरपूलचा पाचवा गोल केला. त्यामुळे नियमित सामन्याअखेरीस दोन्ही संघांत ५-५ अशी बरोबरी होती.

त्यानंतर खेळवण्यात आलेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये लिव्हरपूलने पाचपैकी पाच पेनल्टी यशस्वीरित्या मारल्या. आर्सनलने चार पेनल्टी यशस्वीरित्या मारल्या. मात्र, डॅनी कबेयॉसची पेनल्टी लिव्हरपूलचा गोलरक्षक केलेहरने अडवल्यामुळे आर्सनलने हा सामना गमावला.

मँचेस्टर युनायटेडकडून चेल्सी पराभूत

मार्कस रॅशफोर्डने केलेल्या दोन गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने कारबाओ कप फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात चेल्सीला २-१ असे पराभूत केले. सामन्याच्या २५ व्या मिनिटाला चेल्सीच्या मार्कोस अलोन्सोने डॅनियल जेम्सला पेनल्टी बॉक्समध्ये अयोग्यरीत्या पाडल्याने मँचेस्टर युनायटेडला पेनल्टी मिळाली. याचे रॅशफोर्डने गोलमध्ये रूपांतर करत मँचेस्टर युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत राखली. सामन्याच्या ६१ व्या मिनिटाला चेल्सीच्या मिची बॅश्वाईने अप्रतिम वैयक्तिक गोल करत सामन्यात बरोबरी केली. मात्र, ७३ व्या मिनिटाला रॅशफोर्डने उत्कृष्ट फ्री-किक मारत मँचेस्टर युनायटेडला हा सामना २-१ असा जिंकवून दिला.