सिंधूला पराभवाचा धक्का

चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

pv sindhu
पी. व्ही. सिंधू

विश्व विजेत्या पी.व्ही. सिंधूला चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तिचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या जोडीचाही पराभव झाला. दुसर्‍या फेरीत त्यांनी जपानची जोडी टाकेशी कामुरा आणि किगो सोनोडा यांच्याविरुद्धचा सामना २१-१९, २१-८ असा सरळ सेटमध्ये गमावला. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळतानाही सात्विकसाईराजला सामना जिंकण्यात अपयश आले. त्यांना जपानच्या युकी कानेको आणि मिसाकी मात्सुटोमो या जोडीने ११-२१, २१-१६, १२-२१ असे पराभूत केले.

भारताची स्टार खेळाडू सिंधूचा महिला एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉन्गचा १२-२१, २१-१३, २१-१९ असा पराभव केला. याआधी या दोघींमध्ये झालेले तिन्ही सामने सिंधूने जिंकले होते. सिंधूने या सामन्याचीही अप्रतिम सुरुवात करत पहिल्या गेममध्ये ७-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, पोर्नपावीने आपल्या खेळात सुधारणा केल्याने सिंधूला या गेमच्या मध्यंतरापर्यंत ११-१० अशी अवघ्या एका गुणाची आघाडी होती. मध्यंतरानंतर सिंधूने सलग ८ गुण मिळवत १९-१० अशी आघाडी मिळवली आणि पुढे हा गेम २१-१२ असा जिंकला.

दुसर्‍या गेमच्या सुरुवातीला सिंधूने पोर्नपावीने झुंज दिली. त्यामुळे पोर्नपावीकडे केवळ ९-७ अशी २ गुणांची आघाडी होती. परंतु, यानंतर सलग ६ गुण मिळवत पोर्नपावीने १५-७ अशी आघाडी मिळवली. अखेर तिने हा गेम २१-१३ असा जिंकला. तिसर्‍या गेममध्ये सिंधूने उत्तम सुरुवात केली. मध्यंतराला ११-७ अशी आघाडीवर असणार्‍या सिंधूने पुढेही चांगला खेळ सुरू ठेवत १९-१५ अशी आघाडी घेतली. मात्र, यानंतर पोर्नपावीने सलग ६ गुण मिळवले आणि सिंधूला पराभवाचा धक्का दिला. भारताची दुसरी आघाडीची खेळाडू सायना नेहवालवर पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली होती.

साई प्रणित उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साई प्रणितने चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मागील महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्‍या साई प्रणितने चीन ओपनच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या लू ग्वान्ग झू याच्यावर २१-१९, २१-१९ अशी मात केली. या सामन्यातील दोन्ही गेम चुरशीचे झाले. परंतु, साईने आपला अनुभव पणाला लावत या सामन्यात विजय मिळवला आणि स्पर्धेत आगेकूच केली.