Eco friendly bappa Competition
घर क्रीडा लॉर्ड्स आणि बरंच काही...

लॉर्ड्स आणि बरंच काही…

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. भारताचे आणि लॉर्ड्स मैदानाचा नातं तसा फार जुनं या मैदानात भारताच्या काही खास आठवणी आहेत. या आठवणीनांच उजाळा देणारा हा लेख...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होत आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी मानलं जाणार्‍या लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. लॉर्ड्स नेहमीच त्यावर घडलेल्या किस्स्यांसाठी फेमस आहे. मग अगदी ते गांगुलीच टी-शर्ट काढणं असो किंवा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅशेस सिरीजमधली धमाल…त्यातच भारत आणि लॉर्ड्स यांच्यातही एक वेगळे नाते आहे. भारताचे अनेक आठवणीत राहतील असे किस्से या मैदानात घडले आहेत.

… आणि दादाने टी-शर्ट काढला 

लॉर्ड्सवरील भारतीयांसाठी सर्वात अविस्मरणीय किस्सा म्हणजे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने टी-शर्ट काढून केलेलं सेलिब्रेशन. २००२ मध्ये भारत, श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील नेटवेस्ट सिरीजच्या अंतिम सामन्यात इंग्लंड आणि भारत हे दोन संघ भिडले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत तब्बल ३२५ धावा केल्या. ज्याचा पाठलाग करताना युवा फलंदाज युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी मोक्याचा क्षणी १२१ धावांची भागिदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. पण सामना जिंकताच खरी मजा ही मैदानावर नाही तर पॅव्हेलियनमध्ये दिसून आली. भारताचा कर्णधार गांगुलीने मॅच जिंकताच आपला टी-शर्ट काढून सेलेब्रेशन केलं. मात्र, याचं कारणंही विशेष होतं. या सामन्याच्या काही महिन्यांपूर्वी वानखेडेत झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या फ्लिंटॉफने अप्रतिम गोलंदाजी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला होता. त्याने या विजयाचे सेलेब्रेशन मैदानावरच टी-शर्ट काढत केले होते. त्याचाच बदला गांगुलीने घेतला.

saurav ganguly tshirt
सौरव गांगुली

कपिल देवने टाळला फॉलो-ऑन 

१९९० साली भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिली फलंदाजी करत ६३३ धावांचा डोंगर रचला. त्यानंतर भारताकडून फलंदाजी करताना रवी शास्त्री आणि अझरउद्दीन यांनी शतकी खेळी केली. मात्र त्यानंतर एकाही फलंदाजाला काही खास कामगिरी करता आली नाही. भारताची ९ बाद ४१० अशी अवस्था असताना कपिल देव फलंदाजी करत होता आणि भारताला फॉलो-ऑन टाळण्यासाठी अजूनही २४ धावांची गरज होती. त्यावेळेस बॉलिंग करायला आला इंग्लंडचा ऑफ स्पिनर एडी हेमिंग्स. एडीला सलग चार षटकार ठोकत कपिलदेवने भारताला फॉलो-ऑनपासून वाचवले. यानंतर पुढच्या डावात भारताला खास कामगिरी करता आली नसल्याने भारताने हा सामना गमावला. पण कपिल देवची खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे.

kapil dev
कपिल देव

वेंगसरकरच्या शतकांची हॅट्रिक

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर जिथे इतर फलंदाजांना एक शतक मारणे अवघड जाते, तिथे दिलीप वेंगसरकरांनी १ नाही २ नाही तर ३ सलग शतकं नोंदविली होती. १९७९, १९८२ आणि १९८६ मध्ये शतकं करत वेंगसरकरांनी एक नवा विक्रम केला. लॉर्ड्सवर सलग तीन सामन्यात शतक झळकावणारे ते भारताचे पहिले तर जगातील पाचवे फलंदाज ठरले. वेंगसरकरांनी या आपल्या धमाकेदार खेळीमुळे क्रिकेट जगतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या या अप्रतिम कामगिरीमुळे मैदानाच्या एका भागात त्यांचे चित्र देखील काढण्यात आले होते. वेंगसरकरांचे चित्र काढण्यासाठी खास एक चित्रकारही इंग्लंडहून भारतात आला होता.
- Advertisement -

dilip vengsarkar
दिलीप वेंगसरकर

तेंडुलकर, गावस्करलाही जे जमलं नाही ते आगरकरने करून दाखवलं  

सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर अशा मोठमोठ्या फलंदाजांना लॉर्ड्सवर शतक झळकावता आलं नाही. मात्र भारताचा गोलंदाज अजित आगरकरने ते करून दाखवले. त्याने २००२ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात १०९ धावांची अप्रतिम खेळी केली होती. या सामन्यात भारताला विजयासाठी ५६८ धावांची गरज असताना कोणत्याही भारतीय फलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण अजित आगरकरने १९० चेंडूंत १०९ धावांची अप्रतिम खेळी केली होती. भारताला जरी या सामन्यात १७० धावांनी पराभव पत्करावा लागला असला तरी आगरकरच्या खेळीने या सामन्याला चार चाँद लावले होते.

ajit agarkar
अजित आगरकर

आता आजपासून लॉर्ड्सवर सुरू होणार्‍या कसोटी सामन्यात कोणते नवे किस्से घडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आजचा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० ला सुरू होणार असून सोनी सिक्स आणि सोनी टेन ३ वरून सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -