घरक्रीडाRonaldo : क्रिस्तिआनो रोनाल्डो इज बॅक! पुन्हा खेळणार मँचेस्टर युनायटेडकडून

Ronaldo : क्रिस्तिआनो रोनाल्डो इज बॅक! पुन्हा खेळणार मँचेस्टर युनायटेडकडून

Subscribe

रोनाल्डो याआधी २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळला होता.

सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्तिआनो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) पुन्हा एकदा इंग्लंडमधील बलाढ्य संघ मँचेस्टर युनायटेडकडून खेळताना दिसणार आहे. रोनाल्डो मागील तीन मोसम इटलीतील फुटबॉल संघ ज्युव्हेंटसकडून खेळत होता. मात्र, युनायटेडने त्याला पुन्हा करारबद्ध करण्याची तयारी सुरु केली आहे. मँचेस्टर युनायटेडने याबाबतची घोषणा केली. आता करारातील वैयक्तिक बाबी रोनाल्डोने मान्य केल्यावर त्याची वैद्यकीय चाचणी होईल. या चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडसोबतच्या करारावर स्वाक्षरी करेल. पोर्तुगालचा हा महान खेळाडू ज्युव्हेंटस संघ सोडणार असल्याची मागील काही दिवस चर्चा सुरु होती. अखेर युनायटेडने त्याला करारबद्ध करण्याची तयारी सुरु केली आहे.

युनायटेडकडून केले ११८ गोल

रोनाल्डो याआधी २००३ ते २००९ या कालावधीत मँचेस्टर युनायटेड संघाकडून खेळला होता. या काळात त्याने सर्व स्पर्धांत मिळून २९२ सामन्यांत ११८ गोल केले. तसेच तो संघात असताना मँचेस्टर युनायटेडने आठ स्पर्धा जिंकल्या होत्या. आता त्याच्यासाठी मँचेस्टर युनायटेडचा संघ ज्युव्हेंटसला २५ मिलियन युरो मोजणार आहे. तसेच रोनाल्डो दोन वर्षांचा करार करेल.

- Advertisement -

पाच वेळा बॅलन डी’ओरचा विजेता

रोनाल्डोची फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना होते. ३६ वर्षीय रोनाल्डोने पाच वेळा सर्वोत्तम फुटबॉलपटूला मिळणार बॅलन डी’ओर हा पुरस्कार पटकावला आहे. त्याने मागील तीन मोसमांत ज्युव्हेंटसकडून खेळत असून १३४ सामन्यांत त्याने १०१ गोल केले. तो ज्युव्हेंटस संघ सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती शुक्रवारी ज्युव्हेंटसचे प्रशिक्षक मासिमो अलेग्री यांनी दिली होती. ‘क्रिस्तिआनो यापुढे ज्युव्हेंटससाठी खेळण्यास इच्छुक नाही. त्याने मला तसे सांगितले आहे,’ असे अलेग्री म्हणाले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -