Delhi Capitals Covid : दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंबाबत कोरोनाचा अहवाल जाहीर, सामना होणार की नाही?

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात आज दोन सामने पार पडणार आहेत. पहिला सामना हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात सुरू आहे. तर दुसरा सामना संध्याकाळी चेन्नई सुपरकिंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडणार आहे. परंतु दिल्ली संघातील नेट बॉलरला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा सामना होईल की नाही?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व दिल्लीच्या खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट समोर आला असून त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने सामना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील दिल्ली संघात कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, संबंधित खेळाडू हे कोरोनातून सावरले होते. त्यामुळे सर्वांचे सर्व सामने वेळापत्रकाप्रमाणे खेळवले गेले होते. परंतु आयपीएलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी दिल्ली संघाची कोरोना चाचणी करताना एका नेट बॉलरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना आपापल्या खोल्यांमध्ये राहण्यास सांगितले आहे. मात्र, आता सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटीव्ह आला असून हा सामना होणार असल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबईतील डी.वाय.पाटील मैदानात आजचा सामना होणार आहे. चेन्नईने याठिकाणी ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून टॉप चार संघांमध्ये सामील होण्याचा प्रयत्न दिल्लीचा असेल.