टी-२० वर्ल्डकपचा विचार आतापासूनच नको -रोहित

रोहित

पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकाला अजून बराच कालावधी शिल्लक असून आम्हाला केवळ ही मालिका जिंकण्याचा विचार करण्याची गरज आहे, असे भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसर्‍या टी-२० सामन्याआधी म्हणाला. भारत-विंडीज यांच्यातील तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत असून मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी मुंबईत होईल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक होणार असल्याने आता प्रत्येक टी-२० सामन्याचे महत्त्व वाढले आहे. भारताने मागील काही सामन्यांत संघात बरेच बदल करत युवकांना जास्तीतजास्त संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विश्वचषकासाठी संघबांधणी करत असतानाच सामने जिंकणेही महत्त्वाचे आहे, असे रोहितला वाटते.

टी-२० विश्वचषकासाठी आम्ही संघबांधणी करत आहोत असे मला सतत बोलायचे नाही. या विश्वचषकाला अजून बराच कालावधी शिल्लक आहे. आम्ही केवळ ही मालिका जिंकण्याचा विचार केला पाहिजे. आम्ही जर सामने जिंकत राहिलो आणि चांगले खेळत राहिलो, तर संघ आपोआपच तयार होईल. पुढील काळात आमचा केवळ जास्तीतजास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न असला पाहिजे. या मालिकेत आम्ही खूपच चांगल्या संघाविरुद्ध खेळत आहोत. त्यानंतर आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळू आणि मग आम्ही न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहोत. त्यानंतरही आमचे बरेच टी-२० सामने होणार आहेत. त्यामुळे मला वाटते की, आम्ही फक्त वर्तमानाचा विचार केला पाहिजे आणि मागील सामन्यांत झालेल्या चुका पुन्हा न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे रोहित म्हणाला.

आम्ही कोणत्याही संघाला घाबरत नाही!

टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजला इतर संघ घाबरतात, असे विधान काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने केले होते. मात्र, भारतीय संघ कोणालाही घाबरत नाही, असे रोहित शर्माने स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही संघाला घाबरत नाही. विंडीजने दुसर्‍या टी-२० सामन्यात उत्तम खेळ केला आणि ते जिंकले. आम्ही चांगले खेळलो नाही. प्रत्येक गोष्ट त्या-त्या दिवसावर अवलंबून असते. आम्ही जेव्हा सर्वोत्तम खेळ करतो, तेव्हा आम्ही कोणत्याही संघाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करू शकतो, असे रोहितने सांगितले.