घरक्रीडाIND vs ENG : पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 'या' कारणांमुळे पराभव!

IND vs ENG : पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा ‘या’ कारणांमुळे पराभव!

Subscribe

भारताचा दुसरा डाव १९२ धावांत संपुष्टात आला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला.

चेन्नई येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने हा सामना जिंकण्यासाठी भारतापुढे ४२० धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी भारताचा दुसरा डाव १९२ धावांत संपुष्टात आला आणि इंग्लंडने हा सामना २२७ धावांनी जिंकला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांची मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने या मालिकेत भारताचे पारडे जड मानले जात आहे. परंतु, पहिल्या कसोटीत भारताने निराशाजनक खेळ केला. इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या ५७८ धावांचे उत्तर देताना भारताचा डाव ३३७ धावांत आटोपला होता. त्यानंतर भारताला पुनरागमन करता आले नाही आणि त्यांनी हा सामना गमावला. भारताच्या या पराभवामागे मुख्य कोणती कारणे होती?

  • संघनिवड करताना चुका

भारतीय संघ या कसोटीत चायनामान फिरकीपटू कुलदीप यादवला संधी देईल अशी अपेक्षा होती. मात्र, भारताने अश्विन, शाहबाझ नदीम आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंना संघात स्थान दिले. अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत दोन डावांत मिळून ९ विकेट घेतल्या. मात्र, नदीम आणि सुंदरने त्याला फारशी साथ दिली नाही. नदीमने दोन डावांत मिळून ४ विकेट घेतल्या, पण त्यासाठी २०० हून अधिक धावा खर्ची केल्या. सुंदर एकही विकेट घेऊ शकला नाही.

- Advertisement -
  • फलंदाजांनी केली निराशा

या कसोटीत भारताच्या फलंदाजांना चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या डावात पुजारा (७३), रिषभ पंत (९१) आणि सुंदर (८५) यांनी, तर दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहली (७२) आणि शुभमन गिल (५०) यांनी अर्धशतके केली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांना मोठ्या खेळी करता आल्या नाहीत. रोहित शर्मा (६ व १२) आणि अजिंक्य रहाणे (१ व ०) हे दोन्ही डावांत अपयशी ठरले.

  • रूटची उत्कृष्ट फलंदाजी 

या कसोटीत भारताचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. तर दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जो रूटने उत्कृष्ट फलंदाजी करत पहिल्या डावात २१८ धावांची खेळी केली. तसेच त्याने खेळपट्टीवर वेळ घालवण्याची तयारी दाखवली. त्याने पहिल्या डावात ३७७ चेंडूत खेळून काढले. याऊलट भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक चेंडू (१४३) पुजाराने खेळले. मात्र, या दोघांमध्ये २०० हून अधिक चेंडूंचा फरक होता.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs ENG : ईशांतचे कसोटी बळींचे त्रिशतक


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -