घरक्रीडाIND vs ENG : बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष? पंतसह ‘या’ भारतीय खेळाडूंनी पाहिले...

IND vs ENG : बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष? पंतसह ‘या’ भारतीय खेळाडूंनी पाहिले युरो, विम्बल्डनचे सामने

Subscribe

योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंना पत्र लिहून केले होते.

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच दयानंदच्या संपर्कात आलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय संघ डरहम येथे दाखल झाला असतानाच पंतसह पाच जणांना लंडनमध्येच थांबावे लागले आहे. भारतीय खेळाडूंना २० दिवसांची विश्रांती देण्यात आली होती. मात्र, या काळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन बीसीसीआय सचिव जय शाह यांनी खेळाडूंना पत्र लिहून केले होते.

तसेच शाह यांनी भारतीय खेळाडूंना नुकत्याच झालेल्या युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धा आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धा यांचे सामने स्टेडियममध्ये जाऊन पाहणे टाळा अशा सूचनाही केल्या होत्या. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले. मात्र, काही खेळाडूंनी शाह यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.

  • भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतने इंग्लंड आणि जर्मनी यांच्यातील युरो स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीचा सामना वेम्बली स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता. हा सामना २९ जूनला झाला होता.
  • भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याची पत्नी संजनासह स्पेन आणि इटली यांच्यातील युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामना वेम्बली स्टेडियममध्ये जाऊन पाहिला होता. हा सामना ७ जुलैला झाला.
  • भारताचा फलंदाज हनुमा विहारी इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामना पाहण्यासाठी ८ जुलैला वेम्बली स्टेडियममध्ये गेला होता.
  • भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने विम्बल्डन स्पर्धेच्या सामन्याला हजेरी लावली होती. नोवाक जोकोविच आणि डेनिस शापोवालोव्ह यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना ९ जुलैला झाला.
  • खेळाडूंप्रमाणेच भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही विम्बल्डनचा सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी जोकोविच आणि माटेओ बेरेटिनी यांच्यातील अंतिम सामना पाहिला होता.
- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -