घरक्रीडाIND vs ENG : पृथ्वी शॉ, पडिक्कलला इंग्लंडमध्ये पाठवण्यावरून निवड समिती-संघ व्यवस्थापनात मतभेद?

IND vs ENG : पृथ्वी शॉ, पडिक्कलला इंग्लंडमध्ये पाठवण्यावरून निवड समिती-संघ व्यवस्थापनात मतभेद?

Subscribe

भारतीय संघ व्यवस्थापनाने शॉ आणि पडिक्कल या सलामीवीरांना इंग्लंडमध्ये पाठवण्याची विनंती केली होती.

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल पायाला झालेल्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड या आघाडीच्या संघांमध्ये ४ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. गिलच्या अनुपस्थितीत या मालिकेसाठी सलामीवीर म्हणून भारताकडे रोहित शर्मा, मयांक अगरवाल आणि लोकेश राहुल यांचा पर्याय आहे. परंतु, भारतीय संघ व्यवस्थापन राहुलला सलामीऐवजी मधल्या फळीत खेळवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाने पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीरांना इंग्लंडमध्ये पाठवण्याची विनंती केली होती. मात्र, चेतन शर्मा अध्यक्षीय राष्ट्रीय निवड समितीकडून अजून त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

संघ व्यवस्थापनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष

भारताकडे रोहित, मयांक आणि राहुलच्या व्यतिरिक्त राखीव फळीतील सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनचा पर्याय आहे. परंतु, स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालकडून खेळणाऱ्या ईश्वरनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरण्यासाठी आवश्यक तंत्र अजून त्याच्याकडे नसल्याचे संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. त्यामुळे शॉ आणि पडिक्कल या फॉर्मात असलेल्या सलामीवीरांना इंग्लंडमध्ये पाठवण्यात यावे अशी विनंती संघ व्यवस्थापनाने केली होती. परंतु, त्यांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील महिन्यात ई-मेल पाठवला

‘शुभमन गिल इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रशासकीय व्यवस्थापकांनी निवड समितीच्या अध्यक्षांना (चेतन शर्मा) मागील महिन्यात एक ई-मेल पाठवला होता. यात त्यांनी आणखी दोन सलामीवीर इंग्लंडला पाठवण्याची विनंती केली होती,’ असे बीसीसीआयच्या सिनियर सूत्राने सांगितले. परंतु, संघ व्यवस्थापनाच्या विनंतीकडे चेतन शर्मा यांनी अजून लक्ष दिलेले नाही.

गांगुलीकडे करणार विनंती?  

भारतीय संघ व्यवस्थापन शॉ आणि पडिक्कल या दोन अतिरिक्त सलामीवीरांना इंग्लंडमध्ये पाठवण्याची विनंती थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याकडे करणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल. शाह हे निवड समितीचे सल्लागारही आहेत. ‘शॉ आणि पडिक्कल यांना इंग्लंडमध्ये पाठवण्यासाठी विनंती करणारा ई-मेल अजून गांगुलीला आलेला नाही. शॉ आणि पडिक्कल हे दोघे सध्या श्रीलंकेत आहेत. श्रीलंकेतील सामने २६ जुलैला संपल्यावर या दोघांना इंग्लंडमध्ये पाठवता येईल. परंतु, संघ व्यवस्थापनाला डरहम येथे बायो-बबलमध्ये सरावाला सुरुवात करण्याआधीच हे दोघे इंग्लंडमध्ये हवे आहेत,’ असे सूत्रांनी सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -