आईच्या निधनानंतर सुनील गावस्करांची ‘ती’ आठवण चर्चेत, वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनिल गावसकर यांच्या आई मीनल गावसकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी मीनल गावस्कर यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनिल गावसकर यांच्या आई मीनल गावसकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी मीनल गावस्कर यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुनील गावस्कर हे बांगलादेश आणि भारत यांच्यादरम्यान कसोटी सामन्याचे समालोचन करत होते. त्यावेळी त्यांना आईच्या निधनाची दु:खद बातमी समजली. दरम्यान, मीनल गावस्कर यांच्या निधनानंतर सुनील गावस्कर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्याच्या आईबद्दल लिहिलेली आठवण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (India former captain sunil gavaskar mother passed away in mumbai)

सुनिल गावसकर, आई आणि ती आठवण

सुनील गावसकर यांनी आपल्या सनी डेज आत्मचरित्रातून आईच्या आठवणींना उजाळा दिला होता. सुनील गावसकर यांनी लिहिले की, “माझ्या लक्षात राहिलेली क्रिकेटची पहिली झलक आठवण म्हणजे मी जेव्हा टेनिस चेंडूने माझ्या आईचे नाक फोडले तेव्हाची! आमच्या घराच्या व्हरांड्यात ती मला टेनिसचे चेंडू टाकायची आणि आमचा सामना रंगायचा! व्हरांड्यात जागा किती असणार? आई बिचारी खाली वाकून अगदी हळूवारपणे चेंडू टाकायची. एकदा असाच पट्टा फिरवला आणि चेंडू थेट तिच्या नाकावर जाऊन आपटला. आईच्या नाकातून भळाभळा रक्त वाहू लागलं. तो टेनिसचा चेंडू असला तरी जवळून मारल्यामुळे तिला जोरात लागला होता. चेंडू टाकताना व्हरांड्यात अंतर कितीसं असणार? तिचं रक्त पाहून आमची घाबरगुंडी उडाली! तिने मात्र चटकन आत जाऊन चेहरा धुतला, वेदना आतल्या आत गिळल्या आणि रक्त थांबल्याबरोबर ती बाहेर येऊन पुन्हा मला गोलंदाजी टाकू लागली. पण नंतर आमची फटकेबाजी एकदम बंद पडली. केवळ बचावात्मक पवित्रा घेऊन खेळणे भाग पडलं! आईच्या रक्ताचा सोडा, पण क्रिकेट माझ्यासुद्धा रक्तातच आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही”, असे सुनील गावस्कर यांनी लिहिले.

सुनिल गावस्कर यांनी ‘पुत्र व्हावा ऐसा’ हे सुनीलच्या आठवणींवर आधारित छोटेखानी पुस्तक मीनल गावसकर यांनी लिहिले होते.


हेही वाचा – आयपीएल 2023च्या लिलावात इंग्लिश खेळाडूंना लागली लॉटरी, जाणून घ्या सर्व खेळाडूंची यादी