घरक्रीडालक्ष्य एकच...फायनलमध्ये प्रवेश !

लक्ष्य एकच…फायनलमध्ये प्रवेश !

Subscribe

भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीचा सामना आज

क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने संपले असून, आता खर्‍या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली आहे, असे म्हणता येईल. मंगळवारी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये रंगणार आहे. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे होणार्‍या या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी मागील विश्वचषकातील गतविजेत्या न्यूझीलंडला कमी लेखणे भारताला महागात पडू शकेल. या स्पर्धेमध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांनी 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडने या स्पर्धेची अप्रतिम सुरुवात करत 6 पैकी 5 सामने जिंकले होते. मात्र, मागील तीन सामन्यांत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांनी त्यांना पराभूत केले. त्यामुळे उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या भारताचा पराभव करायचा असल्यास न्यूझीलंडला आपल्या खेळात सुधारणा करावी लागणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड या संघांमधील ट्रेंट ब्रिज येथील साखळी सामना पावसामुळे रद्द करावा लागला. मात्र, विश्वचषकाआधी या संघांमध्ये सराव सामना झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव अवघ्या 179 धावांवर संपुष्टात आला. रविंद्र जाडेजाने झुंजार अर्धशतकी खेळी केली होती. न्यूझीलंडने 180 धावांचे आव्हान 38 व्या षटकात गाठले आणि 6 विकेट्स राखून या सामन्यात बाजी मारली. मात्र, त्या पराभवानंतर भारताने आपल्या खेळात खूप सुधारणा केली.

- Advertisement -

भारत या विश्वचषकातील सर्वोत्तम संघ म्हणून समोर आला आहे. त्यांनी सुरुवातीपासून इतर संघांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे यजमान इंग्लंडलाच त्यांचा पराभव करण्यात यश आले आहे. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल तसेच विराट कोहली या तिघांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु, त्यांना मधल्या फळीची विशेष साथ लाभलेली नाही. त्यामुळे उपांत्य फेरीचा हा सामना जिंकण्यासाठी महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक या अनुभवी खेळाडूंप्रमाणेच युवा रिषभ पंतलाही आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात अष्टपैलू जाडेजाने अवघ्या 40 धावांत 1 विकेट घेतली होती. तसेच तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे आणि अंतिम षटकांमध्ये मोठे फटके मारण्यातही सक्षम आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध त्याला संधी मिळू शकेल. तसेच या सामन्यात भारत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर या तेज त्रिकुटासह मैदानात उतरण्याची दाट शक्यता असल्याने युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंपैकी कोण या सामन्यात खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. त्यांचे वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन (17) आणि ट्रेंट बोल्ट (15) यांनी मिळून 32 विकेट्स पटकावल्या असल्याने त्यांच्यापासून भारताला सावध रहावे लागेल. मात्र, त्यांचा फिरकीपटू मिचेल सँटनरला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांच्या फलंदाजांचे प्रदर्शनही निराशाजनक आहे. याला केवळ केन विल्यमसन आणि रॉस टेलर या दोघांचा अपवाद आहे. विल्यमसनने या स्पर्धेच्या 8 सामन्यांत 96 च्या सरासरीने 481 धावा केल्या आहेत. परंतु, भारताला नमवत न्यूझीलंडला अंतिम फेरी गाठायची असल्यास विल्यमसनला इतर फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे. हा उपांत्य फेरीचा सामना ओल्ड ट्रॅफर्डवर होणार असून, भारताने या मैदानावर या विश्वचषकात दोन (पाकिस्तान, वेस्ट इंडिज) सामने खेळले आणि दोन्ही सामने त्यांना जिंकण्यात यश आले. न्यूझीलंडने या मैदानावरील साखळी सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता.

- Advertisement -

संघ –

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जाडेजा, केदार जाधव, मयांक अगरवाल.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, कॉलिन मुनरो, रॉस टेलर, टॉम लेथम (यष्टीरक्षक), हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी ग्रँडहोम, मिचेल सँटनर, जिमी निशम, इश सोधी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट.

विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कामगिरी
भारत
सामने : 6
विजय : 3
पराभव : 3

न्यूझीलंड
सामने : 7
विजय : 1
पराभव : 6

विश्वचषकात भारत वि. न्यूझीलंड
सामने : 8
भारत विजयी : 3
न्यूझीलंड विजयी : 4
अनिर्णित : 1
(इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताने न्यूझीलंडचा पराभव केलेला नाही)

कोहली-विल्यमसन ‘पुन्हा’ आमने-सामने
विराट कोहलीचा भारतीय संघ आणि केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ यांच्यात विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी रंगणार आहे. हे दोन कर्णधार विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत एकमेकांसमोर येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी 2008 सालच्या 19 वर्षांखालील विश्वचषकात या दोन कर्णधारांच्या संघांमध्ये सामना झाला होता, ज्यात भारताने 3 विकेट्स राखून बाजी मारली होती. या सामन्यात कर्णधार कोहलीने 43 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता इंग्लंडमधील विश्वचषकाची उपांत्य फेरी कोण जिंकणार याची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

रोहितला विक्रमाची संधी

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात विक्रमी कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेत ५ शतके लगावत एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके लागावण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. आता मंगळवारी होणार्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याला आणखी एक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. या विश्वचषकात रोहितने ८ सामन्यांत ६४७ धावा केल्या आहेत. त्यामुळे एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत तो सचिन तेंडुलकर (२००३ विश्वचषकात ६७३ धावा) आणि मॅथ्यू हेडन (२००७ विश्वचषकात ६५९ धावा) यांच्याखालोखाल तिसर्‍या स्थानी आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्ध २७ धावा करत सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -