मालिका गमावूनही भारत अव्वल

इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली असली तरी भारताने आपले आयसीसी कसोटी क्रमवारीतील पहिले स्थान गमावले नाही.

सौजन्य - Cricinfo
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ४-१ असा पराभव झाला. असे असूनही भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

भारताच्या खात्यात ११५ गुण  

भारत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिके आधी पहिल्या स्थानीच होता. भारताच्या खात्यात १२५ गुण होते. पण आता ही कसोटी मालिका गमावल्यामुळे भारताचे ११५ गुण झाले आहेत. तर इंग्लंड भारताविरुद्धची ही मालिका सुरू होण्याआधी ९७ गुणांसह पाचव्या स्थानी होते. मालिका जिंकल्यामुळे आता इंग्लंडच्या खात्यात १०५ गुण झाले आहेत. त्यामुळे इंग्लंडने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असणाऱ्या द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १०६ गुण आहेत. त्यामुळे इंग्लंड त्यांच्यापेक्षा अवघ्या एका गुणाने मागे आहे.

पाचव्या सामन्यातही पराभव 

इंग्लंडने भारताविरुद्धची मालिका ४ सामन्यांनंतर ३-१ अशी आपल्या खिशात घातली होती. अखेरचा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडने भारताला ४६४ धावांचे आव्हान दिले होते. चौथ्या डावात लोकेश राहुल आणि रिषभ पंत या दोघांनीही शतके केली. मात्र ते भारताचा पराभव टाळू शकले नाही. त्यामुळे इंग्लंडने ही मालिका ४-१ अशी जिंकली.

हरलो पण चांगले खेळून 

भारतीय संघ ही मालिका हरले तरी कर्णधार विराट कोहली भारतीय संघ ज्याप्रकारे खेळला त्याबाबत खुश होता. भारतीय संघाने जरी या मालिकेत चुका केल्या असल्या तरी त्यातून शिकून संघ भविष्यात चांगली कामगिरी करेल याचा कोहलीला विश्वास आहे.